रामजन्मभूमीस्थानी भव्य राममंदिराचे आज पंतप्रधा मोदींच्या हस्ते भूमीपूजन अयोध्या नगरी सजली, मान्यवरांचा ओघ
अयोध्या / वृत्तसंस्था
भारतातील अन् जगभरातीलही समस्त हिंदू, गेली अनेक दशके ज्याची उत्कंठेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण आता समीप आला आहे. अयोध्येत रामजन्मभूमीस्थानी निर्माण होणार असलेल्या भव्य राममंदिराच्या भूमीपूजनाचा समारंभ आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम माध्यान्ही 12 वाजून 44 मिनिटे 8 सेकंदाच्या सुमुहूर्तावर होत आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या समारंभासाठी अयोध्या नगरी सजून सज्ज झाली आहे. देशभरातून आमंत्रित करण्यात आलेले 175 मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नगरीतील सर्व मंदिरे, आखाडे, सर्वसामान्यांची घरे, सरकारी आस्थापने आणि इतर सर्व वास्तू यानिमित्त सजविण्यात आल्या असून स्थानिक नागरीकांच्या उत्साहाला भरते आले आहे. सर्वत्र, ज्याच्या त्याच्या तोंडी याच कार्यक्रमाची चर्चा असून स्वप्नपूर्तीचे समाधानही सर्वजण व्यक्त करीत आहेत.
रंगरंगोटी, भजनांचा जागर

वास्तविक, या भूमीपूजन सोहळय़ाला रक्षाबंधनाच्या दिवसापासूनच प्रारंभ करण्यात आला. त्या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम व प्रतीकात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासूनच अयोध्यानगरी उत्साहाने रसरसली आहे. नागरिकांनी त्यांच्या घरांची रंगरंगोटी केली असून मंदिरे, सरकारी अस्थापने व इतर सर्व वास्तू उत्तमरित्या सजविण्यात आल्या आहेत. रामजन्मभूमीकडे जाणारे सर्व मार्गांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मार्गाच्या दोन्ही बाजुला पुष्पमाळा लावण्यात आल्या आहेत. या मार्गांवर दोन्ही बाजुला प्रस्थापित राम मंदिराची भव्य भित्ती पत्रके लावण्यात आली आहेत. आयोध्यानगरीतील सर्व मंदिरे व इतर स्थळांमध्ये सुद्धा गेले तीन दिवस भजने आणि रामनामाच्या कार्यक्रमांचा जागर केला जात आहे. सर्वत्र अमूप उत्साहाचे दर्शन घडत आहे.
नियमांचे पालनही
सद्याच्या परिस्थितीत सामाजिक अंतराचे भान ठेवणे आवश्यक असून कोठेही अनावश्यक गर्दी होऊ नये. यासाठी प्रशासन सज्ज आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्वांना सातत्याने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार असून सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली आहे. रामजन्मभूमीकडे जाणाऱया प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत असून सर्वत्र डोळ्यात तेल घालून पाहणी करण्यात येत आहे. संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून कोणतीही तृटी राहू नये, यासाठी सर्व सरकारी विभाग गेल्या अनेक दिवसांपासून कामाला लागले आहेत.
मुख्य कार्यक्रम 34 सेकंदांचा
पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारा कार्यक्रम 32 ते 34 सेकंदाचा आहे. त्यांच्या हस्ते भव्य राम मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण केले जाईल. त्यानंतर या समारंभाच्या स्मरणार्थ टपाल विभागाच्या एका तिकिटाचे प्रकाशन केले जाईल. या तिकिटावर ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ असे शब्द मुद्रीत करण्यात आले आहेत.
बाहेरच्यांवर निर्बंध
सध्याच्या आव्हानात्मक स्थितीत आयोध्यानगरीत वाजवीपेक्षा अधिक लोक जमू नयेत, यासाठी प्रशासनाने बाहेरहून येणाऱया लोकांवर बंधने घातली आहेत. आयोध्येतील नागरिकांनाही बाहेरच्या लोकांना न बोलाविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सातत्याने सुरक्षा रक्षकांकडून पाहणी व तपासणी करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही दर तासाला घेण्यात येत आहे.
बॅरिकेड्स पितवस्त्र

गर्दी होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेकडून नगरीत सर्वत्र बॅरिकेड्स उभी करण्यात आली आहेत. तसेच लांबलचक पितवस्त्रांनी आणि फुलांच्या माळांनी शहरातील खांबही सजविण्यात आले आहेत. अयोध्याकडे येणाऱया वाहनांची कसून तपासणी सोमवारपासूनच सुरू झाली असून शहरात येणाऱया सर्व वाहनांची सविस्तर माहिती तसेच त्यातून येणाऱया प्रवाशांची व्यक्तिगत माहिती नोंद करण्यात येत आहे.
हनुमान गडीचेही दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाआधी पवित्र हनुमान गडीचे दर्शन घेणार आहेत. याठिकाणी त्यांचे वास्तव पाच ते सात मिनिटे राहणार आहे. प्रभूरामचंद्राचे दर्शन घेण्याआधी प्रभू हनुमंतांचे दर्शन घेण्याची प्रथा असल्याने आधी त्यांचा हनुमान गडीला भेट देण्याचा कार्यक्रम आहे.
कष्टप्रद आंदोलनाच्या यशस्वी सांगतेचा प्रारंभ
राम जन्मभूमीस्थानी भव्य राममंदिर व्हावे यासाठी गेली अनेक दशके विविध हिंदू संघटना आंदोलन करीत होत्या. या आंदोलनांना सर्वसामान्य जनतेच्या व रामभक्तांचाही भरघोस पाठिंबा मिळाला होता. रामजन्मभूमी प्रकरण 1949 पासून न्यायालयात प्रलंबित होते. 9 नोव्हेंबर 2019 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने रामजन्मभूमी हिंदूंचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केल्यानंतर भव्य राममंदिराच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले. या थरारक घटनाक्रमाचा हा संक्षिप्त आढावा.
@1529 : मुस्लीम सत्ताधीश बाबरचा अधिकारी मीर बाकी याच्याकडून बाबरी मशीदीची स्थापना.
@1605 : बाबरी मशिदीजवळ राम चबुतरा स्थापन. चबुतऱयावर राम मूर्तीची स्थापना.
@1855 : रामजन्मभूमी परत मिळविण्यासाठी हिंदूंचे आंदोलन. मुस्लीमांबरोबर संघर्ष.
@1883 : राम चबुतऱयाभोवती मंदिर बांधण्याची अनुमती देण्यास फैजाबाद उपायुक्तांचा नकार.
@जानेवारी 1885 : महंत रघुवरदास यांच्याकडून रामजन्मभूमीसाठी न्यायालयात प्रकरण सादर.
@23 डिसेंबर 1949 : बाबरी मशिदीच्या गर्भगृहात राम मूर्तीचे दर्शन. मुस्लीमांकडून तक्रार सादर.
@5 जानेवारी 1950 : रामचंद्र परमहंस यांच्याकडून मुस्लीम आणि जिल्हा दंडाधिकाऱयांविरोधात नागरी अभियोग.
@3 मार्च 1951 : बाबरी मशिदीतील राम मूर्तीची पूजा करण्यास प्रशासनाची अनुमती.
@6 जानेवारी 1964 : सुन्नी वक्फ मंडळाकडून राम जन्मभूमीवर अधिकार मागणारा अभियोग सादर.
@1981 ते 1989 : राम जन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेचे देशव्यापी आंदोलन.
@1990 : भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची देशव्यापी रथयात्रा. राममंदिरासाठी वातावरण निर्मिती.
@19 ऑक्टोबर 1990 : राम जन्मभूमीच्या अवतीभोवतीची 67 एकर जागा केंद्राकडून अधिग्रहित.
@16 डिसेंबर 1992 : अयोध्येत जमलेल्या लक्षावधी करसेवकांकडून बाबरी मशिदीचे पतन.
@मे 2001 : लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी इत्यादी नेत्यांवर बाबरी पतनाचा गुन्हा सादर.
@30 सप्टेंबर 2010 : राम जन्मभूमीच्या त्रिभाजनाचा अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून आदेश.
@ 6 ऑगस्ट 2019 : प्रकरण चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांचे पीठ स्थापन.
@16 ऑक्टोबर 2019 : सर्वोच्च न्यायालयाच्या पीठासमोर राम जन्मभूमी प्रकरणाची अंतिम हाताळणी सुरू.
@9 नोव्हेंबर 2019 : राम जन्मभूमीचे स्वामीत्त्व रामाचेच असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा एकमुखी आदेश.









