विजयादशमीच्या शुभ दिनी भारतीय नागरिकांनी एकमेकांना सणाच्या शुभेच्छा द्याव्यात, मराठी संस्कृतीप्रमाणे हातावर आपटय़ाच्या पानांचे सोने सोपवावे आणि स्वकियांच्या भेटी घेऊन दिवस आनंदात साजरा करावा हा अलिखित वर्षक्रम आता न्यूज चॅनेल्सच्या ब्रेकिंग जमान्यात कुठेतरी हरवून गेला आहे. छोटय़ा पडद्यासमोर बसून एकापाठोपाठ एक उत्कंठावर्धक वक्तव्यांचे फटाके फुटताना पहावेत, ऐकावेत आणि त्याच विचारात गढून जावे. त्यावरील चर्चेत समाजमाध्यमांनी भर घालत रहावी आणि नवीन ब्रेकिंग न्यूज येईपर्यंत जुनीच चघळत रहावी हा बऱयाच जणांच्या आयुष्याचा भाग बनून गेला आहे. सकाळच्या नाश्त्याच्या, दुपारच्या जेवणाच्या, जेवणानंतर विश्रांतीच्या, विश्रांतीनंतर पुन्हा चहाच्या, चहानंतर सायंकाळच्या बातम्या ऐकत पहात समाजातल्या फार मोठय़ा वर्गाचा वेळ चालला आहे. ज्यांना काही काम धंदे आहेत त्यांच्यासाठी कामावरून परतल्यानंतरची वेळ ही ब्रेकिंग न्यूजसाठी ठेवण्यात आलेली आहेच. दिवसभर ‘फ्री फायर’ आणि ‘क्लॅश ऑफ क्लॅन्स’सारख्या मोबाईल गेममध्ये गुंतलेल्या पिढीने मान उंच केल्यानंतर त्यांनाही जगाची खबरबात कळावी यासाठी रात्री-अपरात्री दिवसभराचा आढावा आणि ज्यांना झोप लागत नाही त्यांच्यासाठी सर्वकालिक ब्रेकिंग न्यूज अशा प्रकारच्या सतत तळपणाऱया माहितीच्या जगात कुणाकुणाचे ऐकायचे असा प्रश्न पडला तर तो फिजुलच असतो. शेवटी लोकांना काही ना काही कानावर पडावे लागते. कारण, जगात काय चालले आहे, याची माहिती जर तुम्हाला नसेल तर तुम्ही इतरांच्या बरोबर चालणाऱया चर्चेत पराभूत व्हाल. तुम्हाला तुमचे म्हणणे समाजमाध्यमावर आक्रमकपणे मांडता येणार नाही. त्यामुळेच तुम्हाला पटणाऱया विचारांचा चहुबाजूने होणारा विचार आणि त्याचे समर्थन, त्याच्यावर केली जाणारी टीका आणि त्या टीकेचे प्रत्युत्तर हे सगळे कानात-मनात साठले पाहिजे. विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालकांनी काय मार्गदर्शन केले, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये काय गोष्टी सांगितल्या, पक्षप्रमुखांनी वीर सावरकर सभागृहातून कोणता घणाघात केला, बीडच्या ताईंनी भगवानगडाच्या पायथ्याला काय संकल्प सोडला या सगळय़ा घडामोडींचे ब्रेकिंग आणि त्यांच्या वरील विश्लेषण यांनी सीमोल्लंघनाचा दिवस उलटल्यानंतर सुद्धा आपला पिच्छा सोडलेला नाही. याचा अर्थ दुसरी एखादी मोठी ब्रेकिंग अद्याप आलेली नाही. त्यामुळे आपण दिवाळीच्या बाजारात लोकलसाठी व्होकल व्हावे की आपले हिंदुत्व अधिक व्यापक करावे, की महाराष्ट्रावर चालून येणाऱयांच्या छाताडावर झेंडा रोवावा की आपल्या नेत्यांना शर्यतीत कायम ठेवून समाजाची वज्रमूठ दाखवून द्यावी याबाबत जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर घेऊन मोकळे व्हावे. आपण अशा सर्व सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर आपले स्वतःचे असे एक काही पक्के मत बनवले पाहिजे अशी अपेक्षा नवीन ब्रेकिंग न्यूज न देण्यामागे असावी. समाजाचे चक्र गतिमान करायचे आहे, कोरोनावर विजय मिळवायचा आहे हे पालुपद आता सात महिने झाले ऐकून ऐकून कंटाळा आला असल्याने नवीन काहीतरी हवे असणार. त्यासाठीच विजयादशमीला नवे काहीतरी मिळेल अशी लोकांची अपेक्षा असणे चुकीचे नाही. पण तब्बल सात महिने अनुयायांच्या प्रत्यक्ष संपर्कापासून दूर असणाऱया मान्यवरांना, सात महिन्याचे काय सांगावे आणि काय नको असे झाले असेल तर त्यांच्याकडून मिळणाऱया मार्गदर्शनात सहकारी संस्थांच्या अहवालात असतो तसा वर्षभराचा मागोवा घेतला जाणे अपेक्षितच आहे. अशा मागोव्यांमध्ये चुकूनही कुठली घटना राहू नये असा प्रयत्न जर ते करत असतील आणि त्या निमित्ताने वर्षभराचा हिशेब चुकता करत असतील तर ते त्यांचे जीवित कार्य करत आहेत, असे आपण समजले पाहिजे. दररोज नवा विषय आणि नवा विचार आता ब्रेकिंग न्यूजमध्ये सुद्धा मिळत नाही. हे वास्तव असताना विचारांचे सोने म्हणून काहीतरी नवीन मिळेल अशी अपेक्षा करणे पूर्णतः चुकीचे नसले तरी आता ऐकणाऱया मंडळींनाच स्थळ-काळाचे भान येण्याची सक्त आवश्यकता निर्माण झाली आहे. परंपरागत सवयीनुसार हे आपण ऐकलेच पाहिजे आणि ती परंपरा खंडित करणे म्हणजे आपल्याच विचारांपासून आपण दूर गेल्यासारखे होईल. त्यात या सात महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात ऐकणाऱयांच्या बंदिस्त बुद्धीवर अन्य कोणत्या विचारांचा प्रभाव तरी पडला नसेल ना याची शंका मार्गदर्शन करणाऱयांना असली तर? ते मग मागचे-पुढचे सगळे एकत्र मिसळून आपल्यापुढे ठेवणार यात नवल असण्याचे कारण नाही. आपण आपल्या विचारांची धार तशीच धारदार रहावी म्हणून त्यांचीच पूर्वीची भाषणे युटय़ूब सारख्या माध्यमातून पुनः पुन्हा ऐकत असतो हे त्यांना कदाचित माहीत नसावे. ‘तेच ते आणि तेच ते’ बोलण्यामागे पुनरुक्तीपेक्षासुद्धा आपल्या विचारांशी आपल्या माणसांना घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न जर नेतेमंडळी करत असतील तर ते परंपरेचे पाईक आणि अध्वर्यू दोन्ही आहेत असेच समजले पाहिजे. आपण आपल्या विचारांपासून आणि उद्दिष्टापासून भटकू नये हा यामागचा शुद्ध हेतू आहे. त्यासाठी त्यांनी केलेली विशुद्ध मांडणीही अत्यंत गरजेचीच होती. हेच आपण आपल्या मनाला समजावणे आणि पूर्वीसुद्धा आपण ऐकत होतो, पुढेही ऐकतच राहू आणि शेवटी आपल्या मनाचेच करत राहू असा दृढनिश्चय करावा. या दृष्टीनेच केलेले हे ते विश्वव्यापी मार्गदर्शन पुढच्या वषी पुन्हा असेच होईल असे मनाशी ठरवून पुढच्या वषीची तीच जागा, तीच वेळ, तेच नेतृत्व आपण मानणार आहोत हे मनाशी पक्के करावे, इतकीच त्यांची अपेक्षा असावी. बाकी सीमोल्लंघन वगैरे या प्रथा आहेत. त्या आपण जपतच असतो आणि आपटय़ाची पाने वाटतच असतो!
Previous Articleमोरू आणि मोरूचा बाप
Next Article सातारा : यवतेश्वर घाटात अपघात, युवक ठार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








