अध्यक्ष आणि सचिव पदी सरकारकडून नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि भाभा अणु संशोधन केंद्राचे (बार्क) संचालक अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. के. एन. व्यास यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून वयाच्या 66 वर्षापर्यंत नियुक्ती केल्याचे शनिवारी उशिरा जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मोहंती यांची मार्च 2019 मध्ये ‘बार्क’चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 1959 मध्ये ओडिशामध्ये जन्मलेल्या मोहंती यांनी 1979 मध्ये एमपीसी कॉलेज, बारीपाडा येथून भौतिकशास्त्र (ऑनर्स) मध्ये पदवी आणि कटकच्या रेवेनशॉ कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरही त्यांनी पुढील शिक्षणासोबतच मुंबई विद्यापीठाची मानद पदवीही मिळवली होती.









