वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशियाकडून 38 हजार 933 कोटी रुपयांची हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याचा व्यवहार भारतासाठी अडचणीचा ठरू शकतो. भारताने ही यंत्रणा खरेदी केल्यास अमेरिकेकडून कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात. अमेरिकेच्या संसदेच्या (काँग्रेस) एका अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उत्तम संबंध असूनही मागील महिन्यात तुर्कस्तानवर निर्बंध लादले गेले आहेत.
काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (सीआरएस) अमेरिकेच्या संसदेची स्वतंत्र संशोधन शाखा आहे. भारत दुसऱया देशांसोबत अधिकाधिक तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त निर्मितीवर भर देत आहे. तर अमेरिका भारताच्या संरक्षण धोरणात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्यासारख्या सुधारणा इच्छित असल्याचे सीआरएएसच्या अहवालात म्हटले गेले आहे.
एस-400 च्या व्यवहारामुळे भारतावर पुन्हा अमेरिकेचे निर्बंध लादले जाऊ शकतात असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. परंतु सीआरएसचा हा अहवाल अमेरिकेच्या संसदेची अधिकृत भूमिका नाही.
2018 मध्ये करार
ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने रशियासोबत एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेच्या 5 युनिट्स खरेदी करण्याचा करार केला होता. 2019 मध्ये भारताने रशियाला पहिला हप्ता म्हणून सुमारे 800 दशलक्ष डॉलर्स प्रदान केले आहेत. भारताला या यंत्रणेच्या सर्व युनिट्सचा पुरवठा 2025 पर्यंत होणार आहे.
जगातील सर्वोत्तम यंत्रणा
एस-400 यंत्रणेला जमिनीवरून आकाशात मारा करणारी जगातील सर्वोत्तम सुरक्षा यंत्रणा मानले जाते. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही एस-400 यंत्रणेच्या पुरवठय़ासह भारतासोबत अन्य संरक्षण करारांकरता पावले टाकली जात असल्याचे रशियाने म्हटले आहे. एस-400 ही यंत्रणा एस-300 चे अत्याधुनिक स्वरुप आहे.









