नावलौकिक : अनेक प्रकल्पांमध्ये सहभाग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक आणि इस्रोचे प्रमुख वैज्ञानिक एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम येथील व्हीएसएससीचे संचालक एस. सोमनाथ देशाचे सर्वोत्तम रॉकेट टेक्नॉलॉजिस्ट आणि एअरोस्पेस इंजिनियर आहेत.
व्हीएसएससीपूर्वी एस. सोमनाथ तिरुअनंतपुरम येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे (एलपीएससी) संचालक देखील राहिले आहेत. त्यांनी इस्रोच्या रॉकेट्सच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. सोमनाथ लाँच व्हेईकलच्या डिझाइनिंगचे मास्ठर आहेत. लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनियरिंग, स्ट्रक्चरल डिझाइन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पाइरोटेक्निसचे तज्ञ आहेत.
अवजड दूरसंचार उपग्रहांना अंतराळात प्रक्षेपित करण्याच्या दृष्टीने जीसॅट-एमके11 (एफ09) अपग्रेड करण्याच्या मोहिमेत ते सामील होते. याचबरोबर जीसॅट-6ए आणि पीएसएलव्ही-सी41 ची क्षमता वाढवत रिमोट सेंसिंग सॅटेलाइट्सना योग्य पद्धतीने प्रक्षेपित करण्याचे कार्य त्यांच्याकडून केले जात होते.
एस. सोमनाथ यांनी केरळ विद्यापीठाच्या क्विलॉन येथील टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ सायन्सेसमधून एअरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये मास्टर पदवी प्राप्त केली. त्यांना रॉकेट डायनेमिक्स आणि कंट्रोलमध्ये प्रावीण्य प्राप्त आहे. ग्रॅज्युएशन केल्यावर त्यांनी 1985 मध्ये एस. सोमनाथ यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर जॉइन केले होते. प्रारंभिक काळात ते पीएसएलव्ही प्रकल्पात कार्यरत होते. त्यानंतर त्यांना 2010 मध्ये जीएसएलव्ही एमके-3 रॉकेटच्या प्रकल्पाचे संचालक करण्यात आले. 2015 मध्ये ते एलपीएससीचे प्रमुख झाले. 2018 मध्ये व्हीएसएससीच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.









