प्रतिनिधी / बेळगाव
एस. जी. बाळेकुंद्री ऑफ टेक्नॉलॉजीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या एन. आय. एस. एम. संस्थेचे व्यवस्थापक राजशेखर तोरगल उपस्थित होते. निमंत्रित म्हणून बेळगावच्या सिद्ध इंजिनिअरचे कार्यकारी संचालक अक्षय निर्वाणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजशेखर यांनी चार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत विद्यार्थी आपले उत्तम व्यक्तिमत्त्व घडवू शकतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिक क्षेत्राच्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
अक्षय निर्वाणी यांनी मुंबईतील एका कंपनीमध्ये प्रारंभी अनुभव घेऊन स्वतःचा उद्योग कसा सुरू केला हे सांगून नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असा सल्ला दिला. प्राचार्य डॉ. एस. व्ही. इटी यांनी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्य वाढवून शिक्षक, पालक व संस्थेचे नाव मोठे करावे, असे सांगितले. प्रारंभी विभाग प्रमुख आर. एल. गलगली यांनी स्वागत केले. समन्वयक प्रा. चिरंजीव पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. विशाल मडिवल्लर यांनी आभार मानले.









