प्रतिनिधी/ बेळगाव
मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आलेल्या निधीमध्ये 5 टक्के रक्कम मागणाऱया धर्मादाय खात्याचे तहसीलदार आणि एका कर्मचाऱयाला एसीबीने रंगेहाथ पकडले असून त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दशरथ नकुल जाधव असे त्या तहसीलदाराचे नाव आहे. त्याचबरोबर संतोष कडोलकर यालाही अटक करण्यात आली आहे.
रामदुर्ग येथील यकलम्मा देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यासाठी आराधना योजनेंतर्गत 4 लाख रुपये मंजूर झाले होते. ते अनुदान देण्यासाठी तहसीलदार दशरथ जाधव व संतोष कडोलकर यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी ट्रस्टचे सुभाष गोडके यांनी एसीबीला याची माहिती दिली. त्यानंतर सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
मंजूर झालेल्या निधीमधील 5 टक्के रक्कम मागत असल्याची माहिती एसीबीचे सीपीआय बी. एस. नेमगौड यांना देण्यात आली. त्यानंतर डी. वाय. कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनीलकुमार यांनी ही धाड टाकून या दोघांना रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.









