सांखळीत डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा
प्रतिनिधी /सांखळी
भुईपाल-सत्तरी येथील एसीजीएल विरोधात कामगारांच्या संपाचा गुरुवारी चौथा दिवस होता. कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधण्यासाठी सांखळी शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यात काँग्रेसच्या सांखळी गट नेत्यांनी आणि पालिका सदस्यांनी सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि उपाध्यक्ष राजेश उजैडकर, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचीही उपस्थिती होती.
सांखळीत गृहनिर्माण वसाहत ते शिवाजी चौक व कॉलेज शेजारील कदंब शेडपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कामगारांनी विविध घोषणा दिल्या व येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी धर्मेश सगलानी, नगराध्यक्ष राया पार्सेकर, राजेश सावळ, खेमलो सावंत, मंगलदास नाईक यांची उपस्थिती होती.
एसीजीएल कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडविणे आवश्यक : नवनिर्माण नेते
ही समस्या गोव्यातच नाही तर संपूर्ण देशात आहे. ज्या ज्या वेळी सरकारने, व्यवस्थापनांनी कामगारांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी त्यांचे पतन झाले आहे, हा इतिहास आहे. सरकारला एकच विनंती आहे, कामगारांचा अंत पाहू नका. कंपनीच्या नफ्यात कामगारांचा हक्काचा वाटा असतो. तो आम्हाला हवा आहे. आज आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात याचसाठी आलोय की, ते कामगारांचे पालक आहेत. याविषयी लक्ष द्या आणि कामगारांचे प्रश्न सोडवा न पेक्षा सर्व कामगार मिळून सरकार उलथवून टाकण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार नेते अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
एसीजीएल कामगारांना काँग्रेसचा पाठिंबा – रेजिनाल्ड
काँग्रेस पक्ष निवडणुका आहेत म्हणून कामगारांना सहकार्य करीत नाही तर गोव्याचे रक्षण करणे आणि कामगारांचे हित जपण्यासाठी आम्ही या कामगारांना सहकार्य करीत आहोत, असे मत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांखळी येथे कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच आपले वैयक्तिक सहकार्य नेहमी असेल, असे ते म्हणाले.
समोरासमोर बसून प्रश्न सोडवूया – धर्मेश सगलानी
एसीजीएल कंपनीने कामगारांचा पौष्टिक आहार बंद केला आहे. गेली तीन वर्षे हा प्रश्न गोव्यातील सरकारला सोडविता आला नाही. कामगारांचे प्रश्न केव्हा सोडविले जातील?, असा प्रश्न सांखळीचे काँग्रेस नेते तथा माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी उपस्थित केला आणि कंपनीने समोरासमोर बसून चर्चा करण्याचे आवाहन केले. राजेश सावळ, राया पार्सेकर, राजेश उजैडकर यांनीही कामगारांना मार्गदर्शन करून आपला पाठिंबा दर्शविला.









