वृत्तसंस्था/ मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीवरच्या एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जधारकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. बँकेने गृहकर्ज व्याजदरात 0.30 टक्के इतकी सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे गृहकर्जधारकांच्या कर्जावरील ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचा फायदा गृहकर्ज मागणीच्या वाढीत होईल, असे एसबीआयला वाटते आहे. 30 लाखापर्यंतच्या गृहकर्जासाठी बँक 6.80 टक्के इतका व्याजदर आकारणार आहे तर 30 लाखावरील गृहकर्जासाठी 6.95 टक्के इतका व्याजदर आकारला जाणार आहे.
पण सदरचा दर हा ग्राहकाचा सीबिल स्कोर पाहिल्यानंतर आकारला जाणार असल्याचे एसबीआयने म्हटले आहे. या सीबिलमध्ये 300 ते 900 अंक दिले जातात. ग्राहकाला यापैकी किती गुण मिळालेले आहेत हे पाहून गृहकर्ज मंजुरीचा निर्णय बँक घेत असते. 0.30 टक्के इतकी सवलत ही ग्राहकाला मिळेल.