प्रतिनिधी/ बेळगाव
वाहन चालकांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी एसपीएम रोड येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नरवर चक्का जाम झाला होता. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू असून याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. यामुळे वाहनचालकांना मात्र तारेवरची कसरत करत वाहने चालविण्याची वेळ आली आहे.
बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून नाथ पै सर्कलपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे वाहनचालक होसूर, विठ्ठलदेव गल्ली, सराफ गल्ली बसवाण गल्लीमार्गे नाथ पै सर्कल गाठत आहेत. याचबरोबर एसपीएम रोडवरील एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, दुसऱया बाजूचे काम अद्याप रखडले आहे. रोडच्या शेजारी अद्याप साईड पट्टय़ा नसल्याने सर्व वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात आहेत. या भागात अनेक बँका असल्यामुळे सर्व वाहने रस्त्याशेजारी लावण्याचे प्रकार घडत आहेत.
रस्त्यावर जागाच शिल्लक नसल्याने मोठे वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवसभरात अनेकवेळा असे प्रकार घडत असल्यामुळे वाहने चालविणे चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.









