प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूरमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ता व गटारी करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे कपिलेश्वर मंदिर ते नाथ पै चौकपर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहने चालविणे कठीण होताना दिसत आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व काम न करता टप्प्याटप्याने काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
नाथ पै चौकपासून बँक ऑफ इंडिया सर्कलपर्यंतच्या स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. त्यामुळे शहापूर, वडगाव, जुनेबेळगाव परिसरातील नागरिकांना शहरात येताना फिरून यावे लागत आहे. एसपीएम रोडवर एकाच बाजूने वाहतूक सुरू करण्यात येत असल्यामुळे कोंडी वाढत आहे. यामुळे वाहने वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडत आहेत.
धुळीचा सामना करत प्रवास
एसपीएम रोडवर एका बाजूचे काम पूर्ण हेऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप दुसऱया बाजूच्या कामाला सुरुवात झालेली नाही. मध्यंतरी खोदकाम करण्यात आल्याने आता सर्वत्र धूळ पसरली आहे. त्यामुळे या धुळीमधूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. व्यापाऱयांनी धूळ दुकानांमध्ये येऊ नये यासाठी प्लास्टिक लावून घेतले आहे.









