प्रतिनिधी/बेळगाव:
एसपीएम रोडवरील स्मार्ट सिटी अंतर्गत विकास काम केले जात आहे. तर दुसऱया बाजुला असणारे जुनाट वृक्ष व त्यांच्या फांद्या तोडण्यात आल्या. यामुळे बुधवारी सकाळपासूनच या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. शहापूर तसेच कपिलेश्वर उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
लॉकडाऊनचे नियम शिथील करताच वाहन चालकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच एसपीएम रोडवरील स्मार्ट सिटीच्या कामालाही सुरूवात करण्यात आली आहे. शिवाजी उद्यान समोरील कॉर्नरवर काम सुरू असल्याने बुधवारी सकाळपासून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. शहापूर, वडगाव, टिळकवाडी या भागातून शहराकडे येणाऱया प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन स्मार्ट सिटीचे काम थांबले होते. ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. रस्त्या शेजारी असणारी जुनाट झाडे काम करताना अडथळे ठरत होती. त्यामुळे अशी झाडे व त्यांच्या फांद्या तोडण्यात आल्या. एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुक कोंडीत भर पडली.









