वाहतुकीस अडथळा : समस्या सोडविण्याची वाहनचालकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखीची ठरत आहे. बँक ऑफ इंडिया कॉर्नर शहापूर येथे रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने लावली जात असल्याने वाहतुकीसाठी अडथळा होत आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून, पार्किंगची समस्या सोडविण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे.
बँक ऑफ इंडिया कॉर्नर येथे अनेक सरकारी व सहकारी बँका आहेत. याचसोबत या परिसरात पीएफ कार्यालय, अनेक खासगी संस्थांची कार्यालये असल्याने वाहने पार्किंगला लावण्यात येतात. बऱयाच वेळा बँकांमध्ये येणाऱया नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे पार्किंगची समस्या जाणवत आहे. रस्त्याशेजारीच वाहने उभी करून वाहनचालक कार्यालयांमध्ये जातात. वाहने रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
शहापूर, महात्मा फुले रोड येथून येणारी वाहने एसपीएम रोड मार्गे शहरात दाखल होतात. परंतु बँक ऑफ इंडिया कॉर्नरनजीक या वाहनांना अडथळा होत असल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.









