प्रतिनिधी / कोल्हापूर
कार्तिकी एकादशी सोमवारी आहे. या पार्श्वभूमीवर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी सूरपेटी, टाळ-मृदंगाच्या गजरात दिगंबरा…दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, विठुनामाचा गजर, हरिनामाचा झेंडा रोवला….असा स्वर आळवत पंढरीच्या विठुरायाला एसटीचे शासनात विलिनीकरण होऊ दे, असे साकडे घातले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांसोबत आलेल्या चिमुकल्यांनीही टाळ्या वाजवत भजनात सहभाग नोंदवला.
एसटी कर्मचारी संपाचा जिह्यातील सहावा दिवस घडामोडीपूर्ण घडला. सकाळपासून आंदोलनस्थळी विविध संघटना, पक्षाचे लोक येऊन संपकऱ्यांना पाठिंबा देत होते. तसेच संपकरी कर्मचारी संपाची धार अधिक तीव्र करण्यासाठी, उर्जा देण्यासाठी भजन, अभंगातून सरकारपुढे गाऱहाणे मांडत होते. एसटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, हम सब एक है, अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दुमदुमून गेला होता.
विविध माध्यमातून संपात फूट पडल्याच्या, काही ठिकाणी एसटी सुरू झाल्याच्या बातम्या आंदोलनस्थळी येत होत्या. मात्र या बातम्या सर्व खोट्या आहेत. हा संप चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या प्रतिक्रिया संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपाला पाठिंबा दिला. वर्ल्ड मराठा असोसिएशमार्फत सकाळी नाष्टा आणि पाण्याची सोय केली होती.









