अप्पर तहसीलदार कार्यालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब मंगळवारी धडक मोर्चा
प्रतिनिधी / सांगली
एसटी संपकऱ्यांची प्रमुख मागणी विलिनीकरणाची असून, यासाठी आजअखेर तब्बल ५२ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. ही मागणी मान्य करायचे सोडून राज्यसरकार एसटी संपवण्याचे प्रयत्न करत आहे. यासाठी सरकार संपात फूट पाडणे, निलंबन व सेवासमाप्ती नोटीसा देणे, समांतर वाहतूक सेवा सुरु करणे आदी संप मोडण्याचे कारस्थान करत आहे. तरीही संपकरी ठाम असून, त्वरीत विलिनीकरण करा, अन्यथा सहकुटुंब आत्महत्येस परवानगी द्या, असा इशारा देत मंगळवार २१ रोजी अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आम नितिन शिंदे यांनी दिली. यावेळी महेश शेळके, सदानंद मदने, सुरेश माने, रुथ कोनेसागर, प्रियानंद कांबळे, जयश्री घोडके, मिना जाधव, प्रतिभा सुतार आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सांगलीतही गेले ४३ दिवस कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना बाजूला ठेवत, हे कर्मचाऱ्यांचे उत्स्फुर्त आंदोलन सुरु आहे. त्यांचा पगार व राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी तफावत • आहे. महागाई, घरखर्च, ज्येष्ठांची औषधे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न करणे अवघड झाल्याने आजवर ५२ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
यावर एकमेव उपाय विलीनीकरण असून, ते होण्याची गरज आहे. आजवर या राज्य व स्थानिक आंदोलनाकडे कोणत्याही नेत्याने पाठींबा दिला नसून, त्यांचे म्हणणेही ऐकले नाही. अजून मृत्यूचे तांडव घडल्यावर सरकार निर्णय घेणार आहे का? यासाठीच त्वरीत राज्यशासनात विलिनीकरण करा, अन्यथा सहकुटुंब आत्महत्येस परवानगी द्यावी, अशा मागणीसाठी २१ रोजी अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.








