कसबा बीड येथे विद्यार्थी, नागरिक व कामगारांच्या वतीने एसटी सुरू करण्यासाठी निदर्शने
कसबा बीड /प्रतिनिधी
एसटी विना ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना महामारी मुळे सर्व रोजगार, व्यवसाय व नोकरी यावर गंडांतर आलेले आहे. आत्ताच जनजीवन सुरळीत होत होते, तोपर्यंत गेली दीड महिना सुरू असलेल्या एसटी संपामुळे विद्यार्थी, नागरिक व कामगार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एसटी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत जाता येत नाही व घरीही वेळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्यायाने खाजगी वाहनाने प्रवास आहे. शिवाय आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे एसटी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी शासनाने सुरु असलेल्या संपावर योग्य निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.
कसबा बीड येथील महिला महाविद्यालय व ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसटी सेवा सुरु करा-विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, सर्वसामान्य जनतेची-एसटी आमच्या हक्काची अशा विविध घोषणा देऊन एसटी सुरू करण्यासाठी निदर्शने केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या कडून प्रवासी बांधवांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे, त्यामधून जनतेचा होणारा फायदा व एसटीचे खाजगीकरण झाल्यास जनतेचे होणारे नुकसान या दोन्ही बाजू कामगार प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत कसबा बीडचे सरपंच सर्जेराव तिबिले, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, कुंभी कासारी संचालक उत्तमराव वरुटे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर गावडे, कल्लेश्वर हायस्कूल चे मुख्याध्यापक नामदेव पवार व स्टाफ, या महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचीता भोसले व स्टाफ, ज्ञान विज्ञान विद्यालयाचे प्राचार्य जनार्दन दिंडे व स्टाफ,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पाटील, प्रकाश तिबिले, दिनकर सूर्यवंशी तसेच एसटी खात्यातील कर्मचारी अशोक भाट, प्रकाश भाट, तानाजी निकम, दत्ता माने, महिला सहकारीमध्ये स्मिता गडकर, मनीषा कांबळे, पुष्पा यादव व आदी उपस्थित होते.









