कणकवली :
कोरोना व त्यामुळे पुन्हा – पुन्हा उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या कारणास्तव एसटी महामंडळाने 14 एप्रिलपासून एसटी बसेस प्रवासी वाहतुकीसाठी बंद ठेवल्या होत्या. मात्र, प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन सोमवारपासून 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरु करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचेही मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी लॉकडाऊन जाहीर झाले, त्यादरम्यान एसटीची वाहतूकही पूर्णत: ठप्प करावी लागली. त्यानंतरच्या काळात काही प्रमाणात शासकीय कर्मचाऱयांसाठी एसटी वाहतूक सुरु होती. पुढे लॉकडाऊच्या नियम शिथिलतेनंतर एसटी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाल्याने एसटी प्रशासनाने 14 एप्रिलपासून वाहतूक थांबविली होती.
या कालावधीतही फक्त शासकीय कर्मचाऱयांची ने-आण करण्यासाठीच एसटी सुरु होत्या. पण, सध्या शेतीचे दिवस असल्याने शेतकरी, नागरिकांना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये जावे लागत आहे. बाजारपेठांमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु असतात. पण, एसटी बसेस बंद असल्याने बाजारपेठांमध्ये पोहोचायचे कसे? हा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत होता. प्रवाशांकडून एसटी बसेस पुन्हा सुरु करण्याची मागणी वारंवार होत होती.
अखेरीस एसटी वाहतूक पुन्हा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सद्यस्थितीत एकावेळी उपलब्ध आसनांच्या फक्त 50 टक्के एवढय़ाच प्रवाशांना एसटीमधून प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार, गरजेप्रमाणे गाडय़ा सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले आहे. CompleteDuration









