कोल्हापूर/प्रतिनिधी
सिग्नलला एस.टी थांबवली नाही म्हणून एस.टी तून प्रवास करणाऱ्या तरुणाने वाहकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वाहक जखमी झाला आहे. राजेंद्र रंगराव पाटील ( वय–२४ रा. कपलेश्वर, ता. राधानगरी, सध्या कागल) असे जखमी वाहकाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात संबंधित नंद्याळच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल दतात्रय कोराणे (वय–२८, रा. नंद्याळ, ता. कागल) असे संशयित तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निपाणी–रंकाळा एस.टी. सकाळी दहा वाजता निपाणी आगारातून निघाली होती. या बसमध्ये प्रसाद शिंदे हे चालक तर राजेंद्र पाटील हे वाहक होते. बसमध्ये राहुल कोराणे याच्यासह अन्य प्रवासी होते. बस दुपारी १२ च्या सुमारास लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरला आली असता कोराणे यांनी वाहक पाटील यांना बस थांबवण्यास सांगितली. मात्र, सिग्नल असल्यामुळे आणि पाठीमागून वाहने येत असल्याने याठिकाणी बस थांबवता येत नसल्याचे पाटील यांनी कोराणेस सांगितले. यामुळे कोराणे यांने वाहक पाटील यांच्याबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी बसमधील अन्य प्रवाशांनी त्याला शांत राहण्याचे आवाहन केले. पण कोणाचेही न ऐकता त्यांने पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत पाटील यांच्या तोंडातून रक्त आले. यामुळे चालक शिंदे यांनी बस थेट लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात घेतली. याठिकाणी प्रवाशांनी कोराणे याच्याविरोधात तक्रारी केल्या.
वाहक पाटील यांनी कोराणे याच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर लक्ष्मीपुरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.