झरे येथे एसटी कामगारांचा मेळावा: ठाकरे सरकारवर निशाणा
आटपाडी / प्रतिनिधी
मोठ्या विश्वासाने महाराष्ट्रातील लोक एसटीने प्रवास करताहेत. पण, आपल्या त्यागाने व सेवेने एसटी महामंडळाला मोठे करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ राज्य सरकारने आणली आहे. वेळेवरही न मिळणारे तुटपुंजे पगारामुळे एसटी कामगारांचे आयुष्य उध्दवस्त होत असून ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्र्यांचा एसटी महामंडळात सचिन वाझे असल्याची टीका भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
दरम्यान, एसटी कामगारांवर ठाकरे सरकारने अन्याय केला असून एसटी कामगारांच्या प्रश्नावर उद्या, मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी झरे (ता.आटपाडी) येथे एसटी कामगारांचा राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने आमदार पडळकरांनी एसटी कामगारांच्या प्रश्नावर राज्यभर एल्गाराचा निर्धार केला आहे. ठाकरे सरकार सत्तेत येवुन दोन वर्षे झाली. पण, कर्मचाऱ्यांचा वेतन करार झाला नाही. महामंडळाला आवश्यकता नसलेल्या गोष्टींसाठी हजारो कोटींचे टेंडर काढुन खासगी कंत्राटदाराचे संपुर्ण देणी दिली. पण, कर्मचाऱ्यांचा हक्काचा पगार दिला जात नाही. हे सर्व कोणाच्या टक्केवारीसाठी चालले आहे? परिवहन मंत्र्यांचा एसटी महामंडव्यातील सचिन वाझे कोण? या सर्वांवर आम्ही प्रकाश टाकणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
ज्या संघटनांनी याबाबत आवाज उठवायचा आहे, त्याच संघटना आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत. एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दबावाला बळी न पडता आपल्या हक्कासाठी लढा उभारावा.. त्यात मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहिन. राज्य सरकारने ‘जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्यावे अशी मागणीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
Previous Articleकिरीट सोमय्या कराडवरून मुंबईकडे रवाना
Next Article गुजरातमध्ये 9 हजार कोटींचे हेरॉईन जप्त








