- परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील तीन महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत (8 ऑक्टोबर) जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.
याबाबत अनिल परब यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. तर उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, रखडलेल्या तीन महिन्याचा पगार 7 ऑक्टोबरपर्यंत द्यावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती. 7 ऑक्टोबरपर्यंत पगार नाही मिळाला तर 9 ऑक्टोबर पासून सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला होता.
मागील साडेपाच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा सोडली तर एसटीचा पूर्णपणे प्रवास बंद होता. अगोदरच एसटी प्रचंड तोट्यात होती. त्यात हे कोरोनाचं संकट आले. त्यामुळे एसटी आणखी तोट्यात गेली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर नुकतंच परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर नुकतेच अनिल परब यांनी 8 ऑक्टोबर रोजी एका महिन्याचा पगार दिला जाईल अशी घोषणा ट्विट करत केली आहे.








