प्रतिनिधी/ रत्नागिरी
शासनाच्या आवाहनाला न जुमानता बेमुदत संपात सहभागी राहिलेल्या रत्नागिरी विभागातील एसटी कर्मचाऱयांना मंगळवारी परिपत्रक काढून सेवेत येण्याची अखेरची संधी देण्यात आली. तरीही बुधवारी रत्नागिरीत संपकरी एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेशी ठाम राहिले आहेत.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने संप मागे घेत असल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. तर संपातील कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत हजर होण्याचे आवाहन मंगळवारी महामंडळाने नवा आदेश जारी करत केले होते. त्यासाठी 22 डिसेंबरची अखेरची संधी देण्यात आली होती. पण रत्नागिरीत सुरू असलेल्या बेमुदत संप एसटी कर्मचारी मागे घेणार का, याकडे लक्ष वेधले होते. पण या दिवशी दिवसभरात या संपकरी कर्मचाऱयांनी अजिबात माघार घेतलेली नसून हा संप सुरूच ठेवला आहे. यादिवशी एसटीच्या 288 फेऱया सुरू झाल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर या दिवशी एकाही कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई झाली नाही.
चिपळूण आगारातून 4 मार्गावरच फेऱया
चिपळूणः एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या महिन्याभराहून अधिक दिवस एसटी कर्मऱयांनी संप पुकारला आहे. संपकाळात चिपळूण आगारात आजवर केवळ 12 कर्मचारी हजर झाल्याने आगारातून 4 मार्गावर एसटी फेऱया सोडण्यात येत आहेत.
आगारातील 40 संपकरी हे मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या संपात सहभागी झाले आहेत. शासनासह महामंडळाकडून एसटी कर्मचाऱयांनी कामगिरीवर हजर होण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर 12 कर्मचारी हजर झाले आहेत. उर्वरित कर्मचारी संपात सहभागी आहेत. हजर झालेल्या कर्मचाऱयांमुळे केवळ 4 मार्गावर एसटी फेऱया सुरु करण्यात आल्या आहेत. यात रत्नागिरी व गुहागर गुहागरसाठी प्रत्येकी 6, पोफळीसाठी 8 तर सावर्डेसाठी 1 फेरीचा समावेश आहे. यातील पोफळी, रत्नागिरी, सावर्डे मार्गावरील फेऱयांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. या फेऱयांप्रमाणेच ग्रामीण भागातील अनारी, दसपटी, खाडी परिसरात फेऱया सुरु करण्याची मागणी होत असली तरी अपुऱया कर्मऱयांमुळे तेही अशक्य आहे. दरम्यान, चिपळूण आगारातील 40 संपकरी हे मुंबईतील आझाद मैदावर सुरु असलेल्या संपात सहभागी झाले आहेत. या संख्येत आणखी वाढ होणार आहे.









