एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचा पाठिंबा
प्रतिनिधी / कोल्हापूर
एसटी कर्मचाऱयांचे पंधरा दिवसांपासून त्यांच्या रास्त मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन, संप सुरू आहे. या संपाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाला सामावून घ्यावे, ही त्यांची मागणी योग्य आहे. मात्र या आंदोलनातून मार्ग काढण्याचे तर सोडाच ते चिरडण्याचे काम आघाडी सरकार करत आहे. कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री, परिवहन राज्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यांनी पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत, असे भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी सांगितले.
एसटी कर्मचाऱयांनी दिवाळी, पाडवा, भाऊबीज साजरी केली नाही. घरदार सोडून त्यांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. त्यांच्या या धैर्याचे कौतुक आहे. आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत भाजप त्यांच्या पाठिशी राहणार आहे, अशी ग्वाही महाडिक यांनी संपकऱयांना दिली.
दुपारी साडेबाराच्या सुमारास माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपचे प्रदेश सदस्य महेश जाधव, अशोकराव देसाई, विजय जाधव, महिला आघाडीच्या गायत्री राऊत यांच्यासह भाजपच्या आदि पदाधिकाऱयांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संपाला पाठिंबा दिला.
परिवहन राज्यमंत्री सपशेल अपयशी
आंदोलन करणाऱया कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. त्यांना हुसकावून लावले जात आहे. आंदेलन करणाऱया कर्मचाऱयांसोबत सरकारने चर्चा करायला हवी होती. मात्र तेही होत नाही. कोल्हापूरचे असलेल्या परिवहन राज्यमंत्र्यांनी मार्ग काढायला हवा होता. मात्र ते या प्रकरणामध्ये सपशेल अपयशी ठरले आहेत, असा टोला धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना लगावला.