कमी भारमानाचाही बसतोय फटका : सध्या 50 टक्के वाहतूक : 1 सप्टेंबरपर्यंत 80 टक्के वाहतूक पूर्ववत
प्रतिनिधी / कणकवली:
राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने गणेशोत्सवासाठी पूर्ण क्षमतेने बसेस सोडण्याबाबतचे नियोजन केले आहे. सद्यस्थितीत जवळपास 50 टक्केपर्यंत फेऱया सोडण्यात येत आहेत. मात्र, शालेय व बेळगाव, पणजीकडे जाणाऱया बसेस बंद आहेत. 1 सप्टेंबरपर्यंत 80 टक्के फेऱया पूर्ववत करण्याचे नियोजन आहे. परंतु, भारमान पुरेशा प्रमाणात नसल्याने तसेच डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे काही अडचणी निर्माण होत असल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून सुमारे 2100 फेऱया सुटत होत्या. यापैकी पणजीकडील 36 व बेळगावकडील 20 फेऱया बंद आहेत. त्या राज्यांकडून बसेसना अद्याप परवानगी नाही. मात्र, इतर ठिकाणची वाहतूक पूर्ववत करण्याचे नियोजन सुरू असून काही प्रमाणात बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, अजूनही अपेक्षीत भारमान नाही. डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तोटा होत असला तरीही बसेस सोडण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवापर्यंत शालेय फेऱया वगळता इतर बसेस सोडण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व फेऱया सोडण्याबाबतची कार्यवाहीही सुरू आहे. 1 सप्टेंबरपर्यंत 80 टक्के फेऱया सुरू होतील. गणेशोत्सव कालावधीत स्थानिक पातळीवर प्रवासी उपलब्धतेनुसार जादा बसेस लागल्या तरीही त्या सोडण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एसटीसाठी महिन्याला 30 टँकर डिझेलचा वापर
सिंधुदुर्ग विभागात पूर्ण क्षमतेने फेऱया सुटत होत्या त्यावेळी महिन्याला डिझेलचे सुमारे 64 टँकर लागत होते. त्यावेळी एक टँकर सुमारे 8 लाखांपर्यंत बसत होता. आता डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून गतसव्वा वर्षाच्या कालावधीनंतर आता हाच टँकर 12 लाखांपर्यंत पोहोचला आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ाला 30 टँकर महिन्याला लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.









