आपापला खर्च भागवण्याच्या सूचना, आर्थिक सल्लागार व मुख्य लेखाधिकारी अशोक फळणीकर यांची माहिती
जान्हवी पाटील/ रत्नागिरी
तिजोरीत पुरेसा पैसा नसल्याने आपल्या विविध आगारांचा खर्च भागवण्यास एस.टी. महामंडळाने असमर्थता व्यक्त केली आहे. प्रत्येक विभागांनी आपले सर्व खर्च निघतेली इतके किमान उत्पन्न मिळवावे असे आवाहन करण्यात आले. महामंडळाकडून वेळोवेळी मदत केली जातेच, मात्र यंदा अशी मदत देण्यासाठी पैसाच नसल्याचे एसटीचे आर्थिक सल्लागार व मुख्य लेखाधिकारी अशोक फळणीकर यांनी स्पष्ट केले आहे. याच कारणामुळे कर्मचाऱयांचे पगार सलग तिसऱया महिन्यातही कमी निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महामंडळाच्या या भुमिकेवर विविध संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.
एस.टी. महामंडळाला जाणवत असलेल्या या आर्थिक टंचाईचा फटका कर्मचाऱयांना बसत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विशेषत: चालक, वाहक आणि मेकॅनिक वर्गातील कर्मचाऱयांचे पगार 77 टक्के, 88 टक्के, 81 टक्के असे होत आहेत. मात्र गुरूवारपर्यंत सर्व डेपोच्या कर्मचाऱयांचे पगार 100 टक्के होतील अशी माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
एस.टी महामंडळाचे आर्थिक सल्लागार, मुख्य लेखाधिकारी अशोक फळणीकर यांच्याशी ‘तरूण भारत’ने संपर्क साधला असता प्रत्येक डेपोने आपले खर्च निघतील इतके उत्पन्न मिळवले पाहिजे. यासाठी प्रवासी संख्या वाढवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकवेळी महामंडळाकडून आर्थिक मदत मिळणार अशी अपेक्षा करून कसे चालेल? असा सवाल त्यांनी केला. सध्या महामंडळाकडेच पैसे नसल्याने विभाग व आगारांचा खर्चासाठी पैसे देणे अशक्य असल्यचेही ते म्हणालो.
महामंडळाकडून दिशाभूल
रत्नागिरी विभागाचे उत्पन्न गेल्या दोन-तीन वर्षापासून स्थिर आहे. यंदाही गतवर्षीपेक्षा उत्पन्न घटले अशी परिस्थिती नाही. मग महामंडळाकडे आताच पैसे कसे सपले असा सवाल महाराष्ट्र कामगार संघटनेसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. महामंडळाकडून दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचेही कर्मचाऱयांचे म्हणणे आहे. केवळ रत्नागिरी जिल्हय़ातच नव्हे तर राज्यभर ही समस्या आहे. यात केवळ चालक-वाहक आणि मेकॅनिकच भरडले जात असल्याचा आरोक कर्मचाऱयांनी केला.
विभागासाठी पावणे सात कोटींची गरज
गतवर्षीपर्यंत महामंडळाकडून 4 कोटी 50 लाख मदत रत्नागिरी एस.टी विभागाला दिली जात होती. यंदा केवळ 3 कोटी 32 लाख इतकीच मदत देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱयांचा पगारासाठी एकूण 6 कोटी 75 लाख रूपयांची गरज असते. मात्र यंदा पैसे नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवशाहीच्या मेनटेनन्सवरच महामंडळाने कोटय़वधी खर्च केले आहे, अन्य बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही काही संघटना प्रतिनिधींनी केला आहे.
दिवसाला 10 लाखांची तूट
एस.टी.विभागाचे दिवसाचे उत्पन्न हे 45 लाख इतके आहे आणि दररोजचा खर्च 55 ते 60 लाख आहे. या खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा असा मोठा प्रश्न विभागासमोर आहे. यातील डिझेलचाच खर्च 35 ते 40 लाखांपर्यत जातो. दुसरीकडे रत्नागिरी विभागाचे उत्पन्न आहे तेवढेच आहे, त्यामुळे त्यात वाढ करण्यासाठी एस.टी विभाग विविध उपक्रम, उपाययोजना करत आहे.
सर्वाना समान न्याय मिळावा
केवळ मेकॅनिक, चालक व वाहकांच्या पगारावर संक्रांत आली असून उर्वरीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱयांचा 100 टक्के पगार झाला आहे. त्यामुळे सर्वाना समान न्याय द्यावा, एकसारखा व एकाचवेळी पगार करावा अशा मागणीचे निवेदन एस.टी कामगार संघटनेकडून विभागीय अधिकाऱयांना देण्यात आले आहे.









