प्रतिनिधी / सोलापूर
सरळसेवा भरती सन – २०१९ मध्ये परिक्षेत पास झालेल्या सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र. १ मध्ये नियुक्त्या दिलेल्या आहेत. तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू आहे. तसेच राज्य संवर्ग सुमारे १५० व सुमारे ८२ अधिका-यांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतू राज्य परिवहन महामंडळाने चालक तथा वाहक पदामध्ये रोजंदार गट क्र. १ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचा-यांची सेवा तात्पूरत्या स्वरूपात खंडीत करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापी महाराष्ट्र शासनाने एसटीची आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिल्याने मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असल्याने स्थगिती मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून, स्थगिती मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
सरळ सेवा भरतीतील निवड यादीमधील सुमारे ४५०० चालक तथा वाहक तसेच सुमारे १५० राज्य संवर्ग व सुमारे ८२ अधिका-यांना प्रशिक्षण स्थगित केल्याने कर्मचा-यांचा कोणताही दोष नसताना तात्पुरत्या नौक-या गमवाव्या लागत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून माणूसकीला काळीमा फासणारी आहे. राज्य परिवहन महामंडळाने भरती करताना आवश्यक असलेल्या रिक्त जागीच जाहीरात काढून भरती केलेली आहे. तर मग केवळ कोरोना महामारीमुळे आर्थिक स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहेत. या नावाखाली सेवा स्थगित करण्याच्या निर्णयामुळे कामगारांवर उपासमारीची आली आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्णयान्वये कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव लॉकडाऊन कालावधीत बेघर / विस्थापित कामगार व परराज्यातील अडकलेली कामगार यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात न करण्याबाबत अथवा कामावरून कमी न करण्याबाबत आदेश निर्गमीत केलेले आहेत. तरीसुध्दा महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे. एसटी प्रशासन परिवहन मंत्री यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोप मुकेश तिगोटे यांनी केला.
सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपीक टंकलेखक, राज्य संवर्ग व अधिकारी पदामध्ये व अनुकंपातत्वावर उमेदवार प्रशिक्षण घेत असल्यास सदर उमेदवारांचे प्रशिक्षण देखील आज रोजी तात्पूरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावे असा निर्णय घेतलेला आहे. निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन, परिवहन राज्यमंत्री यांच्याकडे केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
Previous Articleकर्नाटक : दोन कोरोना पॉझिटिव्ह परीक्षार्थींचा केसीईटीत डंका
Next Article सातारा : धामणेर येथील महिला कोरोना बाधित









