प्रतिनिधी/ बेळगाव
शालेय जीवनाचा अंतिम टप्पा असणारे एसएसएलसीचे वर्षदेखील कोरोनामध्ये अडकून पडले. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी परीक्षा विलंबाने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अभ्यासक्रम पूर्तीच्यादृष्टीने अभ्यासक्रमात कपात होणार असल्याचे सांगूनही कपात करण्यात आली नसल्याने एसएसएलसीचे चित्रच स्पष्ट झालेले नाही. यामुळे एसएसएलसीची वाटचाल करताना शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांची कसोटी असून किमान एसएसएलसी परीक्षेबाबतचे चित्र स्पष्ट व्हावे, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाच्या संकटात शाळांची शैक्षणिक वाटचाल ऑनलाईन सुरू झाली. विद्यागमच्या माध्यमातून दहावीच्या अभ्यासक्रमपूर्तीचे आव्हान शाळांनी पेलले. मात्र, अभ्यासक्रम कपातीबाबत शिक्षण विभागाचे धोरण अस्पष्ट राहिल्याने अडचणीत भर पडत आहे. कोणता अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे आणि कोणता अभ्यासक्रम पाठय़क्रमात आहे, याचे चित्रच स्पष्ट नसल्याने शाळा स्तरावरील एसएसएलसीच्या अडचणी वाढल्या आहेत.
50 ते 60 टक्के अभ्यासक्रम पूर्ण
विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्यादृष्टीने जानेवारी महिन्यात एसएसएलसीचे वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असून याबाबतचे चित्र डिसेंबरअखेर स्पष्ट होणार आहे. प्रामुख्याने एसएसएलसीचा अभ्यासक्रम डिसेंबरअखेर पूर्ण केला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे विविध शाळांनी 50 ते 60 टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामुळे ऑफलाईन एसएसएलसीचे वर्ग, परीक्षेची तारीख आणि अभ्यासक्रमात कपात या बाबींच्या अंमलबजावणीशिवाय चित्र स्पष्ट होणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे.









