बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य शिक्षण मंडळ दहावी (एसएसएलसी) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार केला आहे. वास्तविक, बारावी मंडळाच्या (पीयू) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. हा बदल किरकोळ होईल, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुधारित वेळापत्रकही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी यापूर्वी १४ जून ते २५ जून दरम्यान एसएसएलसी परीक्षा घेण्याविषयी बोलले होते. दुसरी पीयू (राज्य बोर्ड बारावी) परीक्षा २४ मे ते १० जून या कालावधीत होणार होती. परंतु, याच कालावधीत संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) घेतल्यामुळे पीयू परीक्षा आता १० जूनऐवजी १६ जून रोजी संपणार आहे. सुधारित वेळापत्रक १२फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाले. एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षा एकाच वेळी घेण्यात आल्यामुळे होणार्या गैरसोयीमुळे विभाग परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करीत आहे.









