बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु कर्नाटकात १० वी बोर्ड परीक्षा होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी म्हंटले आहे. दरम्यान कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात कोरोनाने सर्व विक्रम मोडले आहेत, गेल्या २४ तासात राज्यात १४,८५९ जणांना संसर्ग झाला आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना एकाच दिवसात कोरोना संसर्ग झालेला नव्हता. राज्यात रुग्णसंख्या वाढत असूनही वेळापत्रकानुसार कर्नाटक एसएसएलसी परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. दरम्यान सीबीएससीने याआधी बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत.
कर्नाटकचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी नुकतीच १० वी बोर्ड परीक्षेविषयी माहिती दिली. शिक्षणमंत्र्यांनी कर्नाटक राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा २१ जून २०२१ पासून घेण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे.









