खासगी शाळा शिक्षकांना थकीत वेतन त्वरित देण्याची मागणी
बेळगाव/ प्रतिनिधी
एसएसएलसी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा खासगी शाळा शिक्षकांनी दिला आहे. खासगी शाळा प्रशासन मंडळ व शिक्षक संघ यांनी थकीत वेतन त्वरित द्या. अन्यथा मूल्यांकनावर बहिष्कार घालू असे सरकारला स्पष्ट कळविले आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष रंगनाथ यांनी म्हटले आहे की, कोविड-19 च्या काळात सरकारच्या मदतीसाठी गणतीसाठी शिक्षक 700 कि. मी. पर्यंत प्रवास करून काम करत राहिले आहेत. त्यांना कंटेन्मेंट झोनमध्येसुद्धा जावे लागले आणि आता कोरोनाची साथ बळावली असताना त्यांना मुल्यमापन करावे लागणार आहे. परंतु याच शिक्षकांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार दिला गेलेला नाही. सरकारने याबाबत लक्ष घालून खासगी शिक्षकांना पॅकेज देण्याची गरज आहे.
शिक्षकांनी रेशन किटसाठी सरकारकडे मदत मागितली नाही. सर्व अडचणीत शिक्षकांनी काम केले आहे. पण वेतन नसल्याने आमचे जीवनच अंधकारात सापडले आहे. अशा वेळी सरकारने आम्हाला विश्वास देणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षकांनी स्पष्ट केले आहे. सरकारने शिक्षकांची कदर केली नाही. सरकारला कोविड-19 च्या काळात सहकार्य केलेल्या शिक्षकांची किंमत नाही. त्यामुळे जर आमचे वेतन मिळाले नाही तर आम्ही मुल्यमापनावर बहिष्कार घालू, असा इशारा संघाने दिला आहे.









