पुणे / वार्ताहर :
एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील 19 संशयित आरोपींवर एक जानेवारीला आरोप निश्चिती (चार्ज प्रेम) होण्याची शक्यता असून, त्यानुसार त्यांच्याविरोधात खटला चालविला जाणार आहे. संशयित 19 आरोपींपैकी नऊ जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यातील सर्व आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला आहे, तर उर्वरित दहा आरोपींपैकी काहींना न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे, तर काही भूमिगत आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सुधीर ढवळे, सागर उर्फ सूर्या गोरखे, हर्षाली पोतदार, रमेश गाईचोर, दौला कामा डेंगळे उर्फ दीपक उर्फ प्रताप, ज्योती जगताप, रोना विल्सन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, कॉ. मिलिंद तेलतुंबडे, कॉ. प्रकाश उर्फ नवीन, कॉ. मंगलू, कॉ. दीपू किशन उर्फ प्रशांतो बोस, अरुण फरेरा, वर्णन गोन्साल्वीस, सुधा भारद्वाज, वरवरा राव अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी आरोपींनी स्वतःचा इलेक्ट्रॉनिक तज्ञ नेमावा, संबंधित तज्ञाने क्लोन कॉपीबाबत सर्व तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना न्यायालयाने मागील तारखेला दिल्या आहेत.
त्यामुळे क्लोन कॉपीबाबत असलेला वाद सरकारी पक्षाकडून आता संपला असून, आरोपींवर कोणत्या कलमान्वये खटला चालवावा, याचा आराखडा नुकताच जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांच्या न्यायालयात सादर केला आहे. त्यानुसार एक जानेवारीपासून या खटल्याची सुनावणी होणार आहे. वरवरा राव आणि रोना विल्सन यांच्यासह काही आरोपींविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायद्या (युएपीए) नुसार कोणतेही पुरावे नाहीत. त्याबाबतचा उल्लेख त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र, सर्व विरोधक आरोपींच्या विरोधात यूएपीए कायदा लावण्यात आला आहे.
बोस, विल्सनच्या ईमेल संभाषणात पंतप्रधानांच्या हत्येचा कट
बंदी असलेल्या सीबीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो (ईआरबी) समितीचा सचिव केंद्रीय समिती सदस्य किशन दा उर्फ प्रशांत बोस आणि रोना विल्सन यांच्यासह संघटनेच्या इतर भूमिगत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट केल्याचे स्पष्ट झाल्याचे पुणे पोलिसांनी याप्रकरणात सादर केलेल्या दोषारोपत्रात नमूद केले आहे. आरोप निश्चितीबाबत सादर करण्यात आलेल्या आराखडय़ात देखील याचा उल्लेख आहे.
दोषारोपत्रात नावे असलेल्या आरोपींचा पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यात आणि लोकशाही शासन व्यवस्था व देशातील नागरिकांच्या विरोधात युद्ध पुकारण्यासाठी सीपीआय (एम) या संघटनेच्या व्यापक कट कारस्थानाचा भाग म्हणून व त्या उद्देशाने अवैध हत्यार व दारुगोळा मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. प्रशांत बोस यांच्यासोबत रोना विल्सन यांचे ईमेलद्वारे झालेले संभाषण पोलिसांना मिळाले होते. त्याबाबतचे एक पत्र देखील पोलिसांच्या हाती आले होते.
माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला होता. रोड शोच्या दरम्यान घातपात घडवून पंतप्रधान राजीव गांधीची ज्या पद्धतीने स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. त्याच पद्धतीने घातपात घडवून आणण्याचा कट केल्याचा त्या पत्रात उल्लेख होता. मात्र आरोपींच्या वकिलांकडून ही सर्व पत्रे खोटी असल्याचा आरोप करण्यात आला होता. एल्गार प्रकरणात संशयित माओवाद्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी देशभरात छापेमारी करत संशयितांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती.









