चौथा, पाचवा एलईडी बल्ब प्रशासनाकडून बेदखल : एलईडी बल्ब संशयास्पद वस्तू नसल्याचे शिक्कामोर्तब?
प्रतिनिधी / मालवण:
दांडी व कोळंब समुद्र किनारी वाहून आलेले हंडी आकाराचे तीन एलईडी बल्ब पोलिसांनी संशयास्पद वस्तू म्हणून पंचनामा करून ताब्यात घेतले होते. परंतु एलईडी बल्ब बेकायदेशीररित्या होणाऱया पर्ससीन नेट मासेमारीसाठी वापरले जात असल्याने हे बल्ब मत्स्य विभागाची जबाबदारी असल्याची भूमिका घेत पोलिसांनी तिन्ही बल्ब मत्स्य विभागाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर गेले दोन दिवस वायरी आणि दांडी आवार समुद्र किनारी वाहून आलेले एलईडी बल्ब ताब्यात घेण्याकरिता पोलीस किंवा मत्स्य विभागापैकी कुणीही पुढे न सरसावल्याने हे बल्ब ‘समुद्री कचरा’च असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बल्ब मच्छीमारांकडेच पडून आहेत.
आतापर्यंत दांडी येथे दोन, कोळंब आणि वायरी जाधववाडी समुद्र किनारी प्रत्येकी एक असे हंडी आकाराचे चार, तर दांडी आवारवाडी येथे पाण्याखाली सोडला जाणारा 4 हजार वॅट क्षमतेचा एक असे एकूण पाच बल्ब आढळून आले. त्यापैकी दांडी व कोळंब येथे घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करून एलईडी बल्ब ताब्यात घेतले होते. परंतु एलईडी बल्बचा वापर बेकायदेशीर मासेमारीसाठी होत असल्याने पोलिसांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांकडे हे बल्ब सुपुर्द केले होते. हे तिन्ही बल्ब मत्स्य विभागाच्या कार्यालयात जमा आहेत. मात्र, गेले दोन दिवस दांडी आवारवाडी व वायरी जाधववाडी येथील समुद्र किनारी सापडलेले एलईडी बल्ब ताब्यात घेण्यासाठी पोलीस किंवा मत्स्य विभागाने तत्परता न दाखविल्याने वाहून येणारे एलईडी बल्ब समुद्री कचरा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनीही सुरुवातीला वाहून येणारे एलईडी बल्ब समुद्री कचराच असल्याचे स्पष्ट करत ते ताब्यात घेण्यास नकार दिला होता. परंतु नंतर पोलिसांपुढे नमते घेत, तीन बल्ब आपल्या कार्यालयात जमा केले होते.
सागरी संवर्धनवालेही गप्प का?
पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर म्हणाले, जेव्हा-जेव्हा एलईडी बल्ब समुद्र किनारी वाहून आलेत, तेव्हा-तेव्हा आम्ही पोलिसांना त्यासंदर्भात माहिती देण्याचे काम केले. पोलिसांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागालाही कळविले आहे. परंतु, आता जर शासकीय यंत्रणा हे एलईडी बल्ब ताब्यात घेणार नसेल, तर आम्ही समुद्री कचरा म्हणूनच ते गोळा करणार आहोत. खंत याचीच आहे, की एलईडी दिव्यांचा कचरा कशामुळे होतोय हे माहिती असूनसुद्धा सागरी पर्यावरण संवर्धन व जतनाच्या बढाया मारणारे शासनाचे संबंधित विभाग मूग गिळून गप्प आहेत. केंद्र व राज्य शासनाने बंदी घालूनसुद्धा एलईडी मासेमारी केली जातेय. प्रखर प्रकाश देणाऱया या एलईडी दिव्यांचा सागरी कासवं, सिगल पक्षी व अन्य सागरी जीवांवर कोणता विपरित परिणाम होतोय, याचे संशोधन करा, अशी मागणीही आम्ही वर्षभरापूर्वी कांदळवन विभागाने कुंभारमाठ येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत केली होती, असे पराडकर म्हणाले.









