
नवी दिल्ली : विजेच्या बचतीत सहाय्य करणारे एलईडी दिवे येणाऱया काळात पाच ते दहा टक्के इतके महागणार असल्याचे समजते. एलईडी दिव्यांमध्ये वापर होणाऱया सुटय़ा भागावरील कस्टम डय़ुटीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याने सदरची वाढ केली जाणार आहे. एलईडी दिव्यामध्ये वापरायचे आतले सुटे भाग हे आयात केले जातात. इलेक्ट्रीक लँप अँड कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष सुमित जोशी यांनी सांगितले की, सरकारने एलईडी दिव्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱया सुटय़ा भागांवर शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे स्थानिक एलईडी निर्मात्यांना दर वाढवणे अपरिहार्य ठरणार आहे. दिव्यांमध्ये वापर होणारे ड्रायव्हर व एमएसपीसीबीसह इतर घटक आयात केले जातात.
जेएसडब्ल्यूच्या पोलाद उत्पादनात वाढ

नवी दिल्ली : पोलाद क्षेत्रातील भारतातील दिग्गज कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलचे जानेवारीत कच्च्या पोलादाचे उत्पादन 2 टक्के इतके वाढले आहे. कंपनीचे उत्पादन जानेवारीत 14.32 लाख टन इतके झाले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात जेएसडब्ल्यू कंपनीने 14.10 लाख टन इतक्या कच्च्या पोलादाचे उत्पादन घेतले होते. यातही मागच्या वर्षात फ्लॅट रोलड् उत्पादनांची निर्मिती 10.14 लाख टन इतकी होती. जी मागील वर्षी 10.25 लाख टन इतकी होती. तर लाँग रोलड् उत्पादनांची निर्मिती 5 टक्के वाढून 3.59 लाख टनवर पोहचली आहे
आयशर मोटर्सच्या नफ्यात 7 टक्के वाढ

नवी दिल्ली : गुरगावातील ऑटो क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आयशर मोटर्सला डिसेंबरला संपलेल्या तिसऱया तिमाहीअखेर 533 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सदरच्या नफ्यात मागच्या तुलनेत 7 टक्के इतकी वाढ झाली आहे. वाहनांच्या मागणीत झालेल्या वाढीचा परिणाम नफ्यात वाढ होण्यात दिसला आहे. याच तुलनेत मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 499 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचा महसूलही 19 टक्के वाढून 2 हजार 828 कोटी रुपयांवर पोहचला आहे.









