मत्स्य विभागावरचा विश्वास उडाला! : तहसीलदार, पोलीस निरीक्षकांकडे पारंपरिक मच्छीमारांची मागणी
प्रतिनिधी / मालवण:
मत्स्य विभागाच्या सागरी गस्तीवर पारंपरिक मच्छीमारांचा विश्वास उडाला असून आता पारंपरिक मच्छीमारांनी स्वत:च्या नौकांद्वारे गस्त घालून बेकायदेशीर एलईडी ट्रॉलर पकडण्याचा निर्धार केला आहे. पकडलेल्या एलईडी नौकांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पारंपरिक मच्छीमारांना सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे पारंपरिक मच्छीमार महेंद्र पराडकर यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
पराडकर यांनी आज तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. केंद्र व राज्य सरकारमधील लोकप्रतिनिधींकडून आतापर्यंत पारंपरिक मच्छीमारांची निराशाच झाली आहे. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या मत्स्य दुष्काळ परिषदेस उपस्थित मत्स्य अधिकारी तसेच केंद्र व राज्य सरकारमध्ये सहभागी राजकीय पक्षांचे विद्यमान आमदार, माजी आमदार व पदाधिकारी यांच्यासमोर पारंपरिक मच्छीमारांनी आपली मत्स्य दुष्काळाची व्यथा मांडली. तरीही बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारी थांबलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय व राज्याच्या हद्दीत बेकायदेशीर एलईडी मासेमारी करणाऱया नौका पकडण्यासाठी मच्छीमारच आता गस्त घालतील, असा पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे. तरी पारंपरिक मच्छीमारांनी पकडलेल्या एलईडी नौकांवर पुढील कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी पराडकर यांनी केली. दरम्यान, अशाप्रकारे मच्छीमारांना ट्रॉलर पकडण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मत्स्य आयुक्तच निर्णय घेऊ शकतात. त्यांना आपल्या निवेदनाची माहिती देतो, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
मत्स्य विभागाकडून फसवणूक!
पराडकर म्हणाले, राज्याच्या हद्दीत साधारणत: 25 वावच्या आत गेले आठवडाभर एलईडी दिव्यांचा प्रकाशझोत किनाऱयावरून मच्छीमारांना दिसतोय. परंतु गस्तीला जाणारे मत्स्य विभागाचे अधिकारी 12 सागरी मैलाच्या आत एलईडी नौका नसल्याचे स्पष्टीकरण देतात. 12 सागरी मैलापलिकडे एलईडी नौका कार्यरत असल्याचे ते सांगतात. त्यामुळे मत्स्य विभागाच्या गस्तीवर आमचा विश्वास राहिला नसून केंद्र व राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर एलईडी मासेमारी करणाऱया नौका पकडण्याचा निर्धार पारंपरिक मच्छीमारांनी केल्याचे पराडकर म्हणाले.









