पारंपरिक मच्छीमारांवर पुन्हा अन्याय झाल्याचा आरोप
प्रतिनिधी / मालवण:
मालवण, दांडी, वायरी, तारकर्ली व देवबागसमोरील समुद्रात एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱया ट्रॉलर्सनी बुधवारी रात्री पुन्हा एकदा उच्छाद मांडला. समुद्र किनाऱयावरून एलईडी दिव्यांचा झगमगाट दिसत होता. यासंदर्भात पारंपरिक मच्छीमार महेंद्र पराडकर यांनी मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, आम्ही गस्तीला दोन पोलीस कर्मचारी द्यायला केव्हाही तयार आहोत. मात्र, मत्स्य विभागाचे अधिकारी समुद्र खवळलेला असल्याने गस्त घालू शकत नसल्याचे सांगत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
मत्स्य विभागाच्या कारभारावर पारंपरिक मच्छीमारांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे एलईडी मासेमारी नौका पकडण्याकरिता पारंपरिक मच्छीमारांना परवानगी द्यावी. पारंपरिक मच्छीमारांनी पकडलेल्या एलईडी नौकांवर कायदेशीर कारवाईची
प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता शासन व प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी पराडकर यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे 15 मे रोजी केली होती. परंतु बेकायदेशीर एलईडी मासेमारी नौका पकडण्याचा अधिकार मत्स्य विभागालाच आहे, तो मच्छीमारांना नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी एलईडी नौका पकडल्यास आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल, असे समजपत्र पराडकर यांना बजावण्यात आले होते.
मात्र, बुधवारी समुद्रात एलईडी नौकांचा झगमगाट दिसताच पराडकर यांनी मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून दांडी किनाऱयांवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी करण्याची मागणी केली. मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पोलिसांनी मत्स्य अधिकाऱयांशी संपर्क केला असता, मत्स्य अधिकाऱयांनी समुद्र खवळला असल्याने जीव धोक्मयात घालून गस्तीस जाऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांना दिल्याचे सांगितले, अशी माहिती पराडकर यांनी दिली. परंतु मत्स्य अधिकारी गस्तीस जाणार असल्यास आमचे दोन पोलीस कर्मचारी गस्तीवर बंदोबस्तासाठी जाण्यास सज्ज आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. अशा रितीने मत्स्य विभागाच्या अकार्यक्षमपणामुळे पुन्हा अशा रितीने पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय झाला आहे, असा आरोप पराडकर यांनी केला आहे.









