प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील एरंडोली येथे राष्ट्रीय महामार्गासाठी खुदाई करतेवेळी फुटलेली पाण्याची पाईपलाईन बदलण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे पत्रव्यवहार करुन लवकरात लवकर पाईपलाईन बदलण्याची मागणी केली होती. पंचायत समितीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी राहूल व्हनखंडे यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रस्ताव पाठविला आहे.
जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव गेल्यानंतर लवकरच त्यास मंजूरी मिळेल. सुमारे 22 लाख रुपये खर्चून 1400 मिटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, काम सुरू होण्यास दिवाळीपर्यंतचा अवधी लागणार असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.








