सोशल मिडियावर छायाचित्रे व्हायरल
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीने जनमानसात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यक्रियेत भाग घेणेही कठीण झाले आहे. त्याचा मृत्यू नेमका कोरोनामुळे झाला आहे की इतर आजारामुळे या विचाराने स्मशानात होणारी गर्दीही कमी झाली आहे. या दहशतीचा अनेकांना फटका बसतो आहे. रविवारी मृत्यू झालेल्या एम. के. हुबळीतील एका वृद्धाचा मृतदेह सायकलवरून न्यावा लागला.
यासंबंधीचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. ‘तरुण भारत’ने यासंबंधीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मृत वृद्धाच्या घराजवळ वाट नव्हती. त्यामुळे सायकलवरून मृतदेह न्यावा लागल्याचे अजब उत्तर शासकीय यंत्रणेकडून देण्यात आला. या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार गावठाण परिसरातील एक 70 वषीय वृद्ध दोन दिवसांपासून आजारी होता. बेळगाव येथील खासगी इस्पितळात उपचार करून त्याला घरी नेण्यात आले होते. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. ही गोष्ट स्थानिक यंत्रणेला समजल्यानंतर कुटुंबीयांना दोन पीपीई किट देण्यात आली.
किट परिधान केलेल्या कुटुंबीयांनी सायकलवरून मृतदेह स्मशानात नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावात याची चर्चा होताच एका लोकप्रतिनिधीने तातडीने मालवाहू रिक्षाची व्यवस्था केली. त्यानंतर रिक्षातून मृतदेह स्मशानात नेण्यात आला. कोरोनाची लक्षणे असल्यामुळे या वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.
या वृद्धाच्या मृत्यूनंतर कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा या संशयाने कोणीच तिकडे फिरकले नाहीत. आरोग्य विभागालाही यासंबंधीची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यांनीही लक्ष दिले नाही. दुपारपर्यंत मृतदेह घरात ठेवून नंतर सायकलवरून कुटुंबीयांनी तो स्मशानात नेल्याचे समजते. अंत्यक्रियेला कोणीच आले नाहीत म्हणून कुटुंबीयांवर ही वेळ आली.









