वाकरे / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून बंद असणारी एम.एस.सी.आय.टी.प्रशिक्षण केंद्रे पुन्हा सुरू करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने विविध अटी व नियमाना अनुसरून परवानगी दिली आहे. त्यामुळे सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या संगणक प्रशिक्षण संस्था आता पुन्हा सुरू होणार आहेत.
शासकीय सेवेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना संगणक साक्षर असणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्यावतीने देण्यात येणार एम.एस.सी.आय.टी. हा अभ्यासक्रम सक्तीचा केला आहे. सदरचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या राज्यात हजारो तर जिल्ह्यात शेकडो अधिकृत संस्था कार्यरत आहेत. दरवर्षी राज्यातून लाखो विद्यार्थी एम.एस.सी.आय.टी. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होतात.यावेळी सुट्टीतील मेगा बॅच वेळी कोरोना रोगाचा प्रसार वाढल्याने मार्च पासून लॉकडाऊन पुकारल्याने सर्व संस्था बंद होत्या.
अर्थातच यामुळे संस्था चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण त्याच बरोबर शासकीय नोकरभरतीमध्ये उतरणाऱ्या तसेच वेतनवाढ मिळणाऱ्या अनेक उमेदवारांना एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र न मिळाल्याने अडचण निर्माण झाली होती. या सर्व बाबींचा विचार करता संस्था चालक व कोल्हापूर जिल्हातील एल.एल.सी.पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी केली होती.तसेच वरिष्ठ पातळीवर एम.के.सी.एल.च्या प्रमुखांनी या मागणीकडे लक्ष वेधले होते. सदर प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी एम के सी एल चे विभाग प्रमुख अनिल गावंडे,जिल्हा प्रमुख सचिन भोईटे तसेच अनेक संस्था प्रमुखांनी प्रयत्न केले.
Previous Articleखऱ्या-खोट्यात अडकला थकीत`एलबीटी’!
Next Article कोगे येथे नदीकाठी मगरीचे दर्शन









