- रांचीमधील रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
ऑनलाईन टीम / रांची :
देशात कोरोना व्हायरस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्यातच आता क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांना झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धोनी सध्या आयपीएल खेळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि मातोश्री देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांनाही रांचीमधील बरियातू रोडवर असलेल्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दोघांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, दोघांची प्रकृती सामान्य आहे. तर ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात असल्याने काळजीचे कोणतंही कारण नाही. सुदैवाने कोरोना दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे दोघांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन ते निगेटिव्ह येतील आणि त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, झारखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने 22 ते 29 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जारी केले आहे. या दरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच धार्मिक स्थळे सुरू असतील मात्र, 5 पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.