पॅरिस / वृत्तसंस्था
स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बापेने पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) संघातर्फे 99 व 100 वा गोल केला. पीएसजीने प्रतिस्पर्धी मोनॅको संघाचा या लढतीत 2-0 अशा फरकाने पराभव केला.
22 वर्षीय फॉरवर्ड खेळाडू एम्बापेने 12 व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. नंतर हाफटाईमला एका अप्रतिम कर्लिंग फटक्यावर गोलजाळय़ाचा दुसऱयांदा अचूक वेध घेतला. लायोनेल मेस्सीचा शानदार पास यावेळी विशेष महत्त्वाचा ठरला. या विजयासह पीएसजी संघाने 13 गुणांसह आपले अव्वलस्थान कायम राखले तर मोनॅकोचा संघ आठव्या स्थानी घसरला.
फ्रान्सच्या राजधानीत झालेल्या या लढतीत एम्बापेने लीग-1 मध्ये 100 गोलचा माईलस्टोन सर केला. एकाच क्लबतर्फे टॉप फ्लाईट गोल्स नोंदवणारा तो सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला. 22 वर्षे, 11 महिने व 23 दिवस इतके वय असताना त्याने हा पराक्रम गाजवला. एम्बापेने पॅरिसमधील संघात दाखल होण्यापूर्वी 2017 मध्ये मोनॅकोतर्फे 16 गोल नोंदवले आहेत.
पॅरिसचा जन्म असलेल्या एम्बापेने 2015 मध्ये मोनॅकोतर्फेच लीग-1 पदार्पण नोंदवले. शिवाय, 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकून दिली. त्यानंतर तो त्याच वर्षात पीएसजी संघाशी करारबद्ध झाला.









