मुंबई \ ऑनलाईन टीम
एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे.या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे. त्याचे व्याप चार पटीने जास्त आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे. मात्र आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने अत्यंत कमी वेळेत रुग्णालयात सोयी वाढवल्या, शेकडो खाटा असलेल्या कोविड केअर सेंटर उभारले. ऑक्सिजनयुक्त खाटाही वाढवल्या त्यामुळे आता महाराष्ट्रात हळू हळू स्थिती नियंत्रणात येत आहे. त्याच प्रमाणे नागपुरात ही स्थिती हळू हळू सुधारत असल्याचा दावा देशमुख यांनी केला.
या अगोदर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर करताना, “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे”. असं अमित देशमुख यांनी सांगितलं होतं.