प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादेची अट आहे. मात्र आता परीक्षेला बसण्यासंदर्भात कमाल संधी मर्यादेचा करण्यात आलेला नियम हा अन्यायकारक आहे. त्यामुळे आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. ठाकरे सरकारचा राज्यात हमे करेसो कायदा या पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यातून आता विद्यार्थीही सुटलेले नाहीत, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
एमपीएससीने गेल्या आठवडÎात परीक्षेला बसण्याच्या कमाल संधीविषयक नवीन नियमावली जारी केली. त्यानुसार खुल्या गटातील विद्यार्थ्यांना सहावेळा परीक्षेला बसता येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नऊ वेळा आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधीची कमाल मर्यादा नाही. या नियमावलीनंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मराठा संघटनांनी या नियमावलीला कडाडून विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठाकरे सरकारच्या धोरणावर कडाडून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, एमपीएससीच्या परीक्षेला बसणारा विद्यार्थी आयुष्यात महत्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करत असतो. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला बसताना वयोमर्यादेची अट आहे. वयोमर्यादेच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना अभ्यास करून उद्दीष्ट गाठावे लागते. याआधी परीक्षेला बसण्याच्या संधीची कोणतीही मर्यादा नव्हती. मात्र नवीन नियमावलीने संधींवर मर्यादा येणार असल्याने विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येणार आहे. वयोमर्यादा जर बसत असली तरी सहा आणि नऊ संधीची मर्यादा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱया क्षेत्रातील करिअरकडे वळावे लागणार आहे. त्यातही अनिश्चितता असणार आहे. ठाकरे सरकारच्या पाठबळाशिवाय एमपीएससी असा निर्णय घेऊ शकत नाही. ठाकरे सरकारचा कारभार हम करेसो कायदा पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे करिअर पणाला लावणारा कमाल संधी मर्यादेचा नियम राज्य सरकारने मागे घ्यावा, असेही पाटील म्हणाले.
परीक्षेला बसताना फी घेता मग संधीचा नियम कशासाठी?
वयोमर्यादेच्या अटीत एमपीएससीची परीक्षा देणारा विद्यार्थी प्रत्येकवेळी परीक्षा शुल्क भरत असतो. एकीकडे फी घेताना कमाल संधीचा नियम कशासाठी?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.
Previous Articleकोल्हापुरात सार्वजनिक मुताऱ्या पाडते तरी कोण?
Next Article दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान व विमा वाटप









