वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. अभिनेता-राजकारणी कमल हासन यांनी स्वतःचा पक्ष मक्कल निधि मय्यमचे (एमएनएम) उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्जदाराला 25 हजार रुपयांचे शुल्कही भरावे लागणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली आहे.
हासन यांचा पक्ष तामिळनाडूसह पुड्डुचेरीतही निवडणूक लढविणार आहे. सदस्य नसलेला व्यक्तीही 21 फेब्रुवारीपासून उमेदवारीकरता अर्ज करू शकणार असल्याची माहिती हासन यांनी दिली आहे. हासन यांच्या पक्षाला बॅटरी टॉर्च हे चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत हासन यांच्या पक्षाला 3.77 टक्के मते प्राप्त झाली होती. काही शहरी भागांमध्ये पक्षाची मतांची हिस्सेदारी 10 टक्क्यांपेक्षाही अधिक होती. एमएनएमने हासन यांनाच निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.
25 फेब्रुवारीपासून मोदींचा प्रचार
भाजपनेही स्वतःची व्यूहनीति आखली आहे. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 फेब्रुवारीपासून प्रचार मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. मोदींची जाहीरसभा होणार असली तरीही त्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
अण्णाद्रमुकमध्येही शुल्क
अण्णाद्रमुकने उमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पक्षाने अर्जाचे शुल्क 15 हजार रुपये ठेवले आहे. केरळ तसेच पुड्डुचेरी निवडणुकीसाठीही ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. केरळसाठी 2 हजार तर पुड्डुचेरीसाठी 5 हजार रुपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.









