मार्गसुचींचे उल्लंघन केल्याचा आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोविड-19 मार्गसुचींचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन एमआयएमचे अध्यक्ष व दोन उमेदवारांविरुध्द येथील मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी एमआयएमचे प्रमुख खासदार असादुद्दीन ओवेसी बेळगावला आले होते. दरबार गल्ली परिसरात दुपारी ते प्रचारासाठी आले होते. त्यावेळी सुमारे 300 जण जमले होते. त्यामुळे मार्गसुचींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एमआयएमचे बेळगाव येथील लतिफखान पठाण व वॉर्ड क्रमांक एकचे उमेदवार जोयाक्तर डोणी, वॉर्ड क्रमांक दोनचे उमेदवार मुस्ताक ताशिलदार यांच्यासह इतर 300 जणांविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी पुढील तपास करीत आहेत.









