मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण : एमआयएमसोबत आघाडी नाहीच
प्रतिनिधी / मुंबई
एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. या प्रस्तावावर अखेर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला असून एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचे शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी रविवारी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेना ही प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असून्ा विचारही हिंदुत्ववादी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे. तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आपल्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याला बळी पडू नका. राज्यातील जनतेत जो संभ्रम निर्माण होत आहे, तो दूर करा, असे उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि जिल्हा प्रमुखांना सांगितले.
भाजपच्या विरोधात जोरदार तयारी करा
महाराष्ट्र हिंदुत्वाच्या विचाराने कसा पेटला हे दाखवून द्या. महाराष्ट्राच्या नादाला लागू नका हे दिल्लीकरांनाही कळू द्या. शिवसेनेच्या भगव्याला बदनाम करणाऱयांना नेस्तनाबूत करा. भाजपने जे मतदारसंघ जिंकले त्याठिकाणी जोरात तयारी करा. भाजपची जिथे ताकद आहे तिथे आपली ताकद वाढली पाहिजे. शिवसेना अंगार आहे, भाजप भंगार आहे हे दाखवू द्या, असे आवाहनही ठाकरे यांनी केलं.
तुमचा काय हिजबूल पक्ष म्हणायचा का ?
भारत-पाकिस्तान बससेवा तेव्हा वाजपेयींनी सुरू केली. न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी इथेपर्यंत आम्ही सगळे बघतो आहे. मग तुमचा काय हिजबूल पक्ष म्हणायचे का? अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱया भाजपवर केली. अयोध्याला गेलो तेव्हा मी सांगितले आम्ही भाजपला सोडलय हिंदुत्व नाही. हे राजकारणासाठी हिंदुत्व करताहेत तर आपण हिंदुत्वासाठी राजकारणात हा मूळ फरक आहे. जस समोर विरोधक आहे त्याच्या कुरापती ओळखा. स्वतः काही केले ते न सांगता आपल्यावर टीका करत असल्याचे ते म्हणाले.
भाजपने 7 वर्षांत काही केले नाही
भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यावर ते म्हणतात, आम्हाला न्याय दिला. परंतु फक्त कालावधी कमी केला आहे. ती कारवाई योग्यच असल्याचे ठाकरे यांनी बोलताना राज्यपालांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. वर्ष होऊन गेले तरी विधानसभा अध्यक्ष तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रस्तावाबाबत बोलताना हा सरकारचा अधिकार तो न करणे हा लोकशाहीचा खून आहे. भाजपचा कारभार म्हणजे 7 वर्षात काहीच केले नाही. केवळ आम्हाला पाकधार्जिणे, देशद्रोही ठरवण्यातच 7 वर्ष गेल्याचे ते म्हणाले.









