फास्ट अँड फ्यूरियस प्रेंचाइजीचा चित्रपट ‘फास्ट 9’ म्हणजेच ‘एफ9’ने कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या भीतीवर मात केली आहे. या चित्रपटाने स्वतःच्या पहिल्या वीकेंडमध्ये एकटय़ा अमेरिकेतच 519 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करत विक्रम नोंदविला आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने अमेरिकन बॉक्स ऑफिसवर 63 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. तर प्रीव्हय़ू शोजी कमाई यात जोडल्यास चित्रपटाने चार दिवसात 70 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 519 कोटी रुपयांहून अधिक गल्ला मिळविला आहे.
जस्टिन लिनच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटात विन डीजलसोबत मिशेल रोड्रिग्ज, टायरिस गिब्सन, जॉन सीना आणि नताली इमॅन्युएल मुख्य भूमिकेत आहे. कोरोना संक्रमण आणि लॉकडाउनमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन अनेकदा लांबणीवर टाकण्यात आले होते. हा चित्रपट 25 जून रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे.

दोन वर्षांतील उच्चांकी कमाई
जबरदस्त कार्सच्या धोकादायक ऍक्शनने नटलेला या चित्रपटातील स्टंटची मोठय़ा प्रमाणार चर्चा होत आहे. अनलॉक झाल्यावर फास्ट अँड फ्यूरियस सागाने प्रेक्षकांना पुन्हा मोठय़ा पडद्यावर परतण्यास भाग पाडले आहे. हा चित्रपट ब्रिटनच्या काही चित्रपटगृहांमध्येही झळकला आहे. तेथे या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 12.90 कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.









