आयएसएल फुटबॉल स्पर्धा : स्पॅनिश स्ट्रायकर इगोरच्या दोन गोलांमुळे पिछाडी भरून काढण्यात एफसी गोवा संघाला यश
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
स्पॅनिश स्ट्रायकर इगोर एँगुलोने दोन मिनिटातच केलेल्या दोन गोलामुळे एफसी गोवाने बेंगलोर एफसी विरूद्धचा सामना सन्मानाने 2-2 असा बरोबरीत सोडविला. आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील ही रोमहर्षक लढत फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आली.
एफसी गोवा संघ या सामन्यात 66 मिनिटापर्यंत दोन गोलानी पिछाडीवर होता. बेंगलोरसाठी ब्राझिलीयन क्लिटॉन सिल्वा (27 वे मिनिट) आणि एरीक पार्तालू (57 वे मिनिट) यांनी तर एफसी गोवाचे दोन्ही गोल इगोर एँगुलो (66 व 68 वे मिनिट) याने केले. या निकालाने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार दोन गोल करणाऱया इगोर एँगुलोला मिळाला. त्याला रोख 50,000 रकमेचे बक्षीस मिळाले.
सामन्यातील पहिली धोकादायक चाल रचली ती बेंगलोर एफसीने. दुसऱयाच मिनिटाला ख्रिस्तियान ऑपसॅत आणि एरीक पार्तालू यांनी संयुक्तपणे रचलेल्या चालीवर सुनील छेत्रीने मारलेला जमिनीलगतचा फटका एफसी गोवाच्या गोलमध्ये जात असताना किंचित हुकला. त्यानंतर पाच मिनिटांनी बेंगलोरला परत एकदा गोल करण्याची संधी मिळाली. यावेळी मोहम्मद आशिक कुर्नियानने आपले स्किल दाखविताना एफसी गोवाच्या दोन बचावपटूंना चकविले, मात्र त्याचा फटका गोलरक्षक मोहम्मद नवाजने अडविला.
नवोदीत खेळाडूंचा समावेश असलेल्या एफसी गोवाचा पहिल्या सत्रातील खेळावर जम बसलाच नाही. यापूर्वीही बेंगलोर एफसी विरूद्ध एफसी गोवाची कामगिरी नेहमीच खराब राहिलेली आहे. बेंगलोरने या सामन्यातही चांगला खेळ केला. शॉर्ट पासेस करण्यावर भर देऊन एफसी गोवाच्या बचावफळीवर त्यानी नेहमीच दबाव कायम ठेवला.
27 व्या मिनिटाला बेंगलोर एफसीने गोल करून आघाडी घेतली. यावेळी हरमनज्योत खाब्राने केलेला लांब थ्रो-ईन एफसी गोवाचा बचावपटू जॉर्ज मेंडोंझाने हेडरने तटविला. मात्र, समोरच असलेल्या क्लिटॉन सिल्वाने परत एकदा हेड मारून गोलरक्षक नवाझला भेदले आणि बेंगलोरला आघाडीवर नेले.
त्यानंतर 43 व्या मिनिटाला आशिक कुर्नियान आणि क्लिटॉन सिल्वा यांनी केलेल्या धोकादायक चालीवर गोल करण्यात सुनील छेत्री परत एकदा अपयशी ठरला. एफसी गोवाने सामन्यातील आपली पहिली धोकादायक चाल पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेत केली. यावेळी इगोर अँगुलोने लाँग बॉलवर दिलेली दिशा गोलरक्षक गुरप्रीत सिंगच्या हातात गेली. मध्यंतरानंतरही बेंगलोर एफसीचा धडाका कायम राहिला. 57 व्या मिनिटाला एफसी गोवाच्या ढिल्या बचावाचा फायदा घेत एरीक पार्तालूने जुआननच्या पासवर मोहम्मद नवाजला भेदले आणि संघाची आघाडी 2-0 अशी केली. त्यानंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फॅर्रांडोने चार बदल केले. लॅनी रॉड्रिग्स, जेम्स डोनाची, प्रिन्सटन रिबेलो आणि लॅन डुंगल यांना वगळले आणि ऐबान डोहलिंग, नॉगुएरा, ब्रँडन फर्नांडिस आणि आलेक्सझांडर जेसूराज रॉमेरियो यांना स्थान दिले.
या निर्णयाचा एफसी गोवाला लगेच फायदा झाला. त्यानंतर केवळ दोन मिनिटांतच एफसी गोवाने दोन गोल केले आणि सामना 2-2 असा बरोबरीत आणला. हे दोन्ही गोल एफसी गोवाचा स्टार स्ट्रायकर इगोर एँगुलोने केले. प्रथम 66 व्या मिनिटाला त्याने पहिला गोल करून पिछाडी एक गोलने कमी केली तर 68 व्या मिनिटाला रॉमेरियोच्या पासवर चेंडूला चेस्ट करून जाळीत टाकले आणि बरोबरी साधली.