केविनकेअरला मिळालं यश : डाबर इंडिया, मॅरीको यांचेही ऍप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या काळामध्ये बरीचशी दुकाने व मॉल्स बंद करण्यात आल्याने अनेकांना घरातूनच लागणारं आवश्यक ते सामान मागवावं लागलं होतं. पॅकेजड उत्पादने, साबण, सॅनिटायझर, बिस्किटे व इतर ग्राहकोपयोगी वस्तू अनेकांनी ऑनलाईनच खरेदी करण्यावर त्या काळामध्ये भर दिला होता. ही बाब लक्षात घेऊन आता एफएमसीजी (ग्राहकोपयोगी वस्तु) कंपन्यांनी स्वतंत्र ऍप विकसित करण्यावर भर दिलाय.
विकसित केलेल्या स्वतंत्र ऍपच्या माध्यमातून एफएमसीजी कंपन्यांना थेट ग्राहकांना सेवा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. केविनकेअर या कंपनीला अशा ऍपचा भरपूर फायदा झाल्याचे समोर आले आहे. चेन्नईमध्ये केविनकेअर यांनी चिक शॅम्पू, गार्डन नमकीन अशा वस्तूंच्या विक्रीसाठी भागीदाराबरोबर एकत्रित ऍप विकसित केले आहे. सदरच्या ऍपच्या माध्यमातून दुकानदारांनी केविनकेअरच्या वस्तू आपल्याकडे साठवून जवळपासच्या ग्राहकांना पुरवल्या. अशा पद्धतीने कंपनीच्या वस्तू वेळेत ग्राहकांना मिळाल्या आहेत. भारतातील 75 हजारहून अधिक दुकानदारांनी या ऍपच्या माध्यमातून कंपनीची उत्पादने विकण्यास सुरुवात केली आहे. केविनकेअरच्या यशाकडे पाहून आता डाबर इंडिया आणि मॅरीको लिमिटेड यांनीही रिटेलर्ससाठी दूरध्वनी सेवा सुरू केली आहे.









