प्रतिनिधी / इस्लामपूर
साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, यामागणीसाठी माजी खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर बापूंच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आमची मागणी व्यावहारिक व कायद्याला धरुन आहे. राजारामबापू कारखान्याने १५ दिवसात एफआरपी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभा करु, पुढील आठवड्यात सहकार मंत्र्यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर ही आंदोलन करणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून या आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान सांगली जिल्हयातील पोलीसांनी त्या-त्या विभागातील पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलनाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले. त्यामुळे खा.शेट्टी यांनी स्वतः येथून राजारामबापूंच्या पुतळ्यासमोर सुमारे तासभर ठिय्या मारला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी.माहूली, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे यांच्यासह अन्य अधिकारी मध्यस्थीसाठी सामोरे गेले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.
यावेळी माहूली म्हणाले, गेल्या वर्षीच्या एफआरपीसाठी काढलेले ७३ कोटी रुपये कर्ज अंगावर आहे. शिवाय ६०० रुपये प्रमाणे निर्यात अनुदानापोटी २४ कोटी रुपये येणे आहे. केंद्र सरकार कडून ११० ते १२० कोटी रुपये येणे आहे. शिवाय साखरेची आधारभूत किंमत ३१ रुपयांवरुन ३३ रुपये वाढवल्यास एफआरपी एकरकमी देवून कारखान्याकडे १० ते २० कोटी रुपये शिल्लक राहतील. याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.
मागील वर्षाच्या ७४ कोटी रूपयांच्या अनुदानासाठी गेल्याच आठवड्यात दिल्लीला जावून वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आठ ते दहा दिवसात रक्कम मिळेल, त्यामुळे १५ दिवसात एफआरपीचा तोडगा काढू, अशी ग्वाही दिली. यावेळी शेट्टी म्हणाले, राजारामबापूंनी वाळवा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या घरात समृध्दी यावी म्हणून प्रयत्न केले. कवठेमहकाळ सारख्या दुष्काळी भागात ही कारखाना उभारला. त्यामुळेच पुतळ्यासमोर येवुन व्यथा मांडत
आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे.
त्याच्या पोरांच्या नोकरी व व्यवसायाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचा बोजा शेतकर्यांवर पडला आहे. भाजीपाला दूधाचे नुकसान झाले आहे. त्याच्यावरही कर्ज व मार्च अखेरीला परतफेड करण्याची जबाबदारी आहे. साखर कारखान्यांनी केंद्राबरोबर संघर्ष करावा,राज्यसाखर संघाने आंदोलन करावे आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू.