वृत्तसंस्था/ लॉसेन
भारताच्या पुरुष हॉकी संघातील ड्रगफ्लिकर हरमनप्रीत सिंग आणि महिला संघातील ड्रगफ्लिकर गुरजित कौर यांना एफआयएच वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. प्रत्येक कॅटेगरीच्या पुरस्कारासाठी खेळाडूंची यादी तयार करण्यात आली आहे.
वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षकाच्या यादीत पीआर श्रीजेशसह तिघांना सामील करण्यात आले आहे तर महिलांमध्ये सविता पुनियाला अन्य दोघींसह या यादीत स्थान मिळाले आहे. वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला संघाचे प्रशिक्षक या पुरस्कारासाठी भारताच्या पुरुष संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड आणि महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक सोएर्द मारिने यांना नामांकन मिळाले आहे. या यादीत एकूण तीन प्रशिक्षकांची नावे सामील आहेत.
हरमनप्रीतने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे आठ सामन्यांतून 6 गोल नोंदवले. भारताने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक मिळविताना कांस्यपदक जिंकले होते. भारताच्या महिला संघानेही ऑलिम्पिकमध्ये प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, त्यात गुरजित कौरची कामगिरी मोलाची ठरली होती. मात्र कांस्यपदकाच्या लढतीत त्यांना ग्रेट ब्रिटनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने उपांत्यपूर्व फेरीत बलाढय़ ऑस्ट्रेलियाला एकमेव गोलने पराभवाचा धक्का देत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले होते. हा एकमेव गोल 25 वर्षीय गुरजित कौरनेच पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला होता.
महिलांमध्ये अर्जेन्टिनाच्या ऑगस्टिना अल्बर्टारिओ, ऑगस्टिना गोर्झेलानी, नेदरलँड्सच्या इव्हा डी गोएद, पेडरिक माटला, मारिया व्हरस्कूर यांनाही सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पुरुष विभागात हरमनप्रीतसह सुवर्णविजेत्या बेल्जियमच्या आर्थर व्हान डोरेन, अलेक्झांडर हेन्ड्रिक्स, रौप्यविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या जेक व्हेटॉन, ऍरन झालेवस्की, टिम ब्रँड यांचेही सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. सर्वोत्तम गोलरक्षकाच्या पुरस्कारासाठी श्रीजेशव्यतिरिक्त बेल्जियमचा व्हिन्सेन्ट वानाश, ऑस्ट्रेलियाचा अँड्रय़ू चार्टर यांचे नामांकन झाले आहे. महिलांमध्ये या पुरस्कारासाठी ग्रेट ब्रिटनची मॅडी हिन्च, अर्जेन्टिनाची बेलेन सुसी यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी महिलांमध्ये भारताची शर्मिला देवी, ग्रेट ब्रिटनची फिओना क्रॅकल्स व अर्जेन्टिनाची व्हॅलेन्टिना रॅपोसो तर पुरुषांमध्ये भारताचा विवेक सागर प्रसाद, दक्षिण आफ्रिकेचा मुस्तफा कासीम, न्यूझीलंडचा सीन फिन्डले यांचे नामांकन झाले आहे. सर्वोत्तम प्रशिक्षकासाठी रीड यांच्यासह बेल्जियमचे शेन मॅक्लीऑड, ऑस्ट्रेलियाचे कॉलिन बॅच तर महिलांमध्ये भारताच्या सोएर्द मारिने, नेदरलँड्सचे ऍलीसन अन्नान, ग्रेट ब्रिटनचे मार्क हॅगेर यांना नामांकित करण्यात आले आहे. ज्यांना नामांकन मिळाले आहे, त्यांच्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक, मीडिया, चाहते आपले मत नोंदवू शकतात. 23 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून 15 सप्टेंबर ही यासाठी अखेरची मुदत असल्याचे एफआयएचने सांगितले.









