तरुण भारत संवाद
प्रमिला चोरगी / सोलापूर
राज्य परिवहन महामंडळाने चालक विभागात महिलांना संधी देण्यासाठी जडवाहतूक लायसन्स ही अट शिथिल करून राज्यातील 142 महिलांच्या हाती आता एसटीचे स्टेअरिंग देणार आहे. यापैकी सोलापूर विभागात आता दोन महिला दाखल झाले आहेत, तर किरकोळ कारणामुळे अपात्र ठरलेल्या आणखी पाच महिलांना चालक म्हणून संधी मिळणार आहे. या महिला चालकांचे तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10 एप्रिलनंतर या महिला एस.टी. चालविण्यास सज्ज होणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळ चालक विभाग वगळता महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर होते. आतापर्यंत शासनाने चालक भरतीसाठी काढलेल्या निविदांमध्ये 35 टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित होत्या. मात्र पुरुषांप्रमाणेच स्त्रियानांही अटी-नियम लागू होते. या अटी-नियमांची पूर्तता होणेच अश्यक असल्याने या भरती प्रक्रियेकडे महिला वर्गानी पाठ फिरविली होती. त्यामुळे परिवहन महामंडळ स्थापनेपासून सन 2019 पर्यंत एकही महिला चालकाची भरती झाली नव्हती.
चालक विभागातही महिलांचा सहभाग असावा आणि महिलांना प्रोत्साहन मिळावे, या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने पुरुषांच्या तुलनेत महिलांना अटीमध्ये शिथिलता आणली अन् राज्यात पहिल्याच भरती प्रक्रियेत 142 महिला एस.टी.चे स्टेरिंग सांभाळण्यासाठी सज्ज झाले. सोलापूर विभागात 57 जागांपैकी 27 महिलांनी अर्ज सादर केले होते. 27 पैकी पूनम डांगे व दिक्षा घुली या दोन महिलांची चालक म्हणून निवड करण्यात आली. या दोघींना तीन महिन्यांचे प्रशिक्षण सोलापूर कार्यालयातून देण्यात येत आहे, तर काही किरकोळ त्रुटींअभावी अपात्र ठरलेल्या आणखी पाच महिलांना चालक म्हणून संधी देण्यासाठी सोलापूर विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे या तीन महिन्याच्या कालावधीत सोलापूर विभागात सात महिला चालक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसटी चालकांसाठी जुने नियम व अटी
– उंची 153 सें. मी.
– उंचीनुसार वजन
– वैद्यकीय तपासणी
– जडवाहतुकीचे पक्के लायसन
– एखाद्या ठिकाणी तीन वर्ष जडवाहतूक चालविल्याचा अनुभव प्रमाणपत्र
– जातीचा दाखला व इतर शैक्षणिक कागदपत्रे
– स्त्री पुरुषांना सारखेच
आताच्या नवीन नियम व अटी
– उंची 153 सें. मी.
– उंचीनुसार वजनाचा विषय नाही
– वैद्यकीय तपासणी
– लाईट चारचाकी व दुचाकी गाडीचे लायसन्स
– सहा महिने गाडी चालवित असल्याचा अनुभव
– एस. टी. महामंडळ स्वतः प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणार
दोघी महिला चालक बाहेरच्या जिह्यातील
– सोलापूर विभागात चालक म्हणून प्रशिक्षण घेत असलेल्या पूनम डांगे या मूळच्या औरंगाबाद येथील आहेत, तर दीक्षा घुले ही मूळची नांदेड येथील आहे. सोलापूर विभागात रिक्त जागा अधिक असल्याने त्यांनी अर्जामध्ये सोलापूर विभागात काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे ते आता याच विभागात कार्यरत राहतील.